Australia vs England, Women's World Cup 2022 Final Highlights: ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाने रविवारी (३ एप्रिल) ख्रिस्टचर्च येथे इंग्लंडला ७१ धावांनी पराभूत करत एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकावर विक्रमी सातव्यांदा नाव कोरलं. ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा फलंदाजी करत ५० षटकात ३५६ धावांचा डोंगर उभा केला. ३५७ धावांच्या लक्षाचा पाठलाग करायला आलेला इंग्लंडचा संघ मात्र ४४ व्या षटकातच तंबुत परतला. इंग्लंडला सर्वबाद केवळ २८५ धावाच करता आल्या. एलिसा हिलीला सामनावीर आणि मालिकावीर म्हणून सन्मानित करण्यात आलं. इंग्लंडने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी निवडली. मात्र, त्यांचा हा निर्णय चुकीचा ठरला. ऑस्ट्रेलियाकडून एलिसा हिली आणि रचेल हेंस या सलामीवीर जोडीने तब्बल १६० धावांची भागिदारी केली. इंग्लंडची गोलंदाज सोफी एकलेस्टनने हेंसला ६८ धावांवर बाद केलं. यानंतर एलिसाला बेथ मूनीने साथ दिली. या दोघींनी दुसऱ्या विकेटसाठी १५६ धावांची भागिदारी केली. एलिसा हिलीने शतक झळकावत विक्रम केला. यासह एलिसा विश्वचषकाच्या उपांत्य आणि अंतिम फेरीत शतक झळकावणारी पहिली खेळाडू ठरली. मूनी ६२ धावा करून बाद झाली, तर एलिसाने १३८ चेंडूत तब्बल १७० धावांची तुफान खेळी केली. ऑस्ट्रेलियाने ५ विकेट गमावत ३५६ धावांचा डोंगर उभा केला. इंग्लंडकडून अन्या श्रबसोलने ३ खेळाडू बाद केले. हेही वाचा : पत्नीचं शतक पूर्ण होताच तणावात असलेल्या मिचेल स्टार्कच्या चेहऱ्यावर हसू, VIDEO पाहा… दरम्यान, ३५७ धावांच्या लक्षाचा पाठलाग करायला आलेला इंग्लंडचा संघ मात्र ४४ व्या षटकातच तंबुत परतला. इंग्लंडला सर्वबाद केवळ २८५ धावाच करता आल्या. इंग्लंडचा बुरुज ढासाळत असताना नतालिया स्किव्हरने एकाकी झुंज देत शतक झळकावलं. मात्र, तिची ही झुंज कामी आली नाही. ३५७ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडची डॅनियल वेट ४ धावांवर आणि टॅमी बेमॉन्ट २७ धावांवर तुंबत परतल्या. ऑस्ट्रेलियाची गोलंदाज मेगन स्कटने दोघींना बाद केलं.