बर्मिंगहममध्ये सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय वेटलिफ्टिंग खेळाडूंनी आपला दबदबा निर्माण केला आहे. स्पर्धेच्या चौथ्या दिवशी भारतीय महिला वेटलिफ्टिंगपटू हरजिंदर कौरने ७१ किलो वजनी गटात कांस्य पदकाची कमाई केली आहे. कौरने एकूण २१२ किलो वजन उचलून इंग्लंडच्या सारा डेव्हिस आणि कॅनडाच्या अॅलेक्सिस अॅशवर्थला मागे टाकत थरारक स्पर्धेत कांस्यपदकावर कब्जा केला.
स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी वेटलिफ्टिंगमध्ये भारताला एक सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्य पदकाची कमाई झाली होती. मीराबाई चानूने सुवर्ण, महाराष्ट्रच्या संकेत सरगरने रौप्य, गुरुराजा पुजारी कांस्य आणि बिंद्याराणी देवीने रौप्यपदकाची कमाई केली होती. ऑलिंपिक रौप्य पदक विजेता मीरबाई चानू एकून २०१ किलो ग्रॅम वजनाचा भार पेलवून भारताला यावर्षीचे पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. २०१ किलो ग्रॅम वजन उचलून तिने राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत एक नवीन विक्रम नोंदवला. २७ वर्षीय चानूने स्नॅच, क्लीन अँड जर्क आणि एकूण वजनातही नवे विक्रम प्रस्थापित केले.
त्यानंतर तिसऱ्या दिवशी लालरिन्नुगा आणि अचिंत शेउलीने सुवर्णपदक पटकावत भारताचा गौरव वाढवला. अचिंत शेउलीने रविवारी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत विक्रमी कामगिरी करत भारतासाठी तिसऱ्या सुवर्णपदकाची कमाई केली. २० वर्षीय अंचितने ७३ किलो वजनी गटामध्ये सुवर्णपदक पटकावले. राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये पश्चिम बंगालच्या या खेळाडूने १४३ किलो वजन उचलले. हा या स्पर्धेतील नवीन विक्रम ठरला आहे. अंचितच्या अगोदर युवा वेटलिफ्टिंगपटू जेरेमी लालरिन्नुगाने पुरुषांच्या ६७ किलो वजनी गटात स्नॅचमध्ये १४० किलो आणि क्लीन अॅण्ड जर्कमध्ये १६० किलो असे एकूण ३०० किलो वजन उचलत अग्रस्थान मिळवले होते.
हेही वाचा – CWG 2022: भारतीय ज्युदोपटूंची कमाल; सुशीला देवीला रौप्य तर विजय कुमार यादवला कांस्य पदक
वेटलिंफ्टिंगमध्ये आतापर्यंत भारताच्या नावावर एकूण सात पदकांची नोंद झाली आहे. या सात पदकांपैकी तीन पदकं मुलींनी तर चार मुलांनी जिंकली आहेत.