World Champion D Gukesh Wins Rapid Title: बुद्धिबळच्या रॅपिड आणि ब्लिट्सझ या प्रकारातील कमजोर खेळाडू म्हणून हिणवल्या गेलेल्या भारताच्या डी गुकेशने या स्पर्धेतील रॅपिड प्रकाराचे जेतेपद पटकावले आहे. सध्याचा वर्ल्ड चॅम्पियन असलेल्या डी गुकेशने पुन्हा एकदा जागतिक स्तरावर आपलं वर्चस्व गाजवलं आहे. शुक्रवारी क्रोएशियातील झाग्रेब येथे झालेल्या ग्रँड चेस टूर २०२५ रॅपिड अँड ब्लिट्झमध्ये रॅपिड जेतेपद गुकेशने आपल्या नावे केलं आहे.

गुकेशला मॅग्नस कार्लसनने या स्पर्धेतील कमजोर खेळाडू असं हिणवलं होतं, पण आता या स्पर्धेतील रॅपिड प्रकारात अव्वल क्रमांक मिळवला आहे. मॅग्नस कार्लसनला या स्पर्धेतील चौथ्या फेरीत पराभूत करून त्याच्या वाक्याचं गुकेशने चोख प्रत्युत्तर दिलं होतं.

१९ वर्षीय गुकेशने उत्कृष्ट कामगिरी आणि जबरदस्त फॉर्म दाखवत १८ पैकी १४ गुणांसह अव्वल स्थान पटकावले. त्याने अंतिम फेरीतही उत्कृष्ट कामगिरी केली आणि विजयी ठरला. गुकेशच्या या स्पर्धेतील मोहिमेची सुरूवात पराभवाने झाली. पहिल्या फेरीत त्याला जॅन क्रिज्स्टोफ दुडाकडून पराभव पत्करावा लागला. पण या पराभवामुळेच गुकेशने अजून जोमानं मेहनत करत पुढच्या सामन्यांमध्ये विजय मिळवला.

पहिल्या पराभवानंतर गुकेशन सलग पाच विजयांची आश्चर्यकारक मालिका कायम ठेवली. ज्यामध्ये चौथ्या फेरीत जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या मॅग्नस कार्लसनला त्याने पुन्हा एकदा पराभवाचा दणका दिला. यामुळे तो आघाडीवर पोहोचला आणि स्पर्धेत त्याची पकड मजबूत झाली.

सातव्या आणि आठव्या फेरीत अनिश गिरी आणि क्रोएशियाच्या इव्हान एरिक विरुद्ध बरोबरी साधल्यानंतर, गुकेशने अंतिम फेरीत रॅपिड सेक्शनमध्ये वेस्ली सो वर महत्त्वपूर्ण विजय मिळवला. गुकेशची अचूकतचा, संयम यामुळे तो स्पर्धेतील एक मोठा कट्टर प्रतिस्पर्धी ठरला.

विश्वविजेत्याने गुकेशने चमकदार कामगिरी केली, तर भारतीय संघाचा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंद थोडा मागे राहिला. एका विजयासह, सात ड्रॉसह आणि एका पराभवासह, प्रज्ञानंद ९ गुणांसह चौथ्या स्थानी राहिला. प्रज्ञानंद एकूण क्रमवारीत अजूनही शर्यतीत आहे, त्याने मे महिन्यात बुखारेस्टचा टप्पा जिंकला होता आणि वॉर्सामध्ये तिसरे स्थान मिळवले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०२५ च्या ग्रँड चेस टूरमधील तिसरा टप्पा हा ब्लिट्झ विभागातील सुपरयुनायटेड रॅपिड अँड ब्लिट्झ शनिवारी सुरू होईल आणि ६ जुलै रोजी संपेल. रॅपिड आणि ब्लिट्झ दोन्ही फॉरमॅटमधील एकत्रित गुण स्पर्धेचा एकूण विजेता निश्चित करतील. अमेरिकेत (ऑगस्टमध्ये) उर्वरित भाग आणि ब्राझीलमध्ये (सप्टेंबर-ऑक्टोबर) अंतिम फेरीसाठी झाग्रेबमधील गुकेशचा दमदार फॉर्म हा भारतीय बुद्धिबळसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो.