भारताच्या दीपिका पल्लिकल आणि हिरदर पाल सिंग संधू या अनुभवी जोडीने गुरुवारी स्क्वॉशच्या मिश्र दुहेरी गटात सुवर्णपदकाची कमाई केली. पुरुष एकेरीत सौरव घोषालला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. स्क्वॉशमध्ये भारताने एकूण चार पदके मिळवली आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली.

दीपिका व हिरदर जोडीने अंतिम फेरीत आयफा बिंटी अजमन आणि मोहम्मद सयाफिक बिन मोहम्मद कमल जोडीचा ३५ मिनिटे चाललेल्या सामन्यात ११-१०, ११-१० असा पराभव केला. सौरव घोषालला एकेरीत मलेशियाच्या इयेन यो एंगकडून ११-९, ९-११, ५-११, ७-११ असे पराभूत व्हावे लागले. भारताने २०१४च्या पुरुष सांघिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले होते. तर, गेल्या स्पर्धेत दोन रौप्य व एक कांस्य अशी कामगिरी भारताने केली होती. यंदा मात्र भारताने दोन सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्यपदक मिळवले.

हेही वाचा >>>Asian Games: १९ वर्षीय कुस्तीपटू पंघालने जिंकले कांस्यपदक, महिला कुस्तीत खाते उघडले; पूजा-मानसी आणि चीमा पराभूत

मिश्र दुहेरीची अंतिम लढत भारतीय जोडी सहज जिंकेल असे वाटत होते. मात्र, दुसऱ्या गेममध्ये मलेशियन जोडीने भारतासमोर आव्हान उपस्थित केले. मलेशियाच्या जोडीने ३-९ अशा पिछाडीनंतर गेम ९-१० अशा स्थितीत आणला. मात्र, दीपिका व हिरदर यांनी संयमाने खेळ करत दोन गुणांची कमाई केली व सामना जिंकला. दीपिका यापूर्वी कांस्यपदक जिंकणाऱ्या महिला संघाचा भाग होती. दुसरीकडे, एकेरीच्या सामन्यात अंतिम फेरीपर्यंत एकही गेम न गमावणारा घोषाल सुरुवाताला ८-६ असा पिछाडीवर होता. यानंतर त्याने खेळ उंचावत पहिला गेम जिंकला. दुसरा गेम मलेशियाच्या खेळाडूने ११-९ असा जिंकत पुनरागमन केले. तिसऱ्या व चौथ्या गेममध्ये घोषालचा त्याच्यासमोर निभाव लागला नाही. अखेर भारताच्या अनुभवी खेळाडूला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोर्टवर काय झाले हे माझ्या फारसे लक्षात राहत नाही. मला केवळ अखेरचे गुण आठवतात. मी खूप आनंदी आहे. सुवर्णपदक जिंकल्याने हा आनंद आणखी द्विगुणीत झाला आहे. -दीपिका पल्लिकल