विनायक मोहनरंगन
शाहगंज कॉलनी, अवधपुरी कॉलनी हा परिसर ताजमहालसाठी प्रसिद्ध आग्रा शहरापासून ९ किलोमीटरवर आहे. जसजसं गुगल मॅपच्या साथीने तुम्ही भारतीय क्रिकेटपटू दीप्ती शर्माच्या घराजवळ जाता आणखी एक महत्त्वाचं ठिकाण तुमच्या नजरेतून सुटणार नाही. त्या कॉलनीत प्रवेशद्वारावर एक मोठी कमान आहे. त्यावर लिहिलं आहे- अर्जुन पुरस्कारप्राप्त दीप्ती शर्मा मार्ग- सर्वजन विकास समिती अवधपुरी आपका हार्दिक स्वागत करती है. याच परिसरात दीप्ती लहानाची मोठी झाली. इथल्या प्रत्येक घरातले काका, काकू, ताईदादा ही सगळी दीप्तीचीच माणसं आहेत.
‘इथेच आम्ही लहानाचे मोठे झालो. दीप्तीला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी परिसरातले रस्ते सुधारायला हवेत असं सांगितलं. आधी रस्ते इतके चांगले नव्हते’, दीप्तीचा भाऊ सुमीत शर्माने सांगितलं. ‘आता या रस्त्याला दीप्ती शर्मा मार्ग असं नाव देण्यात आलं आहे. दीप्तीने देशासाठी अभिमानास्पद कामगिरी केली आहे. त्यामुळे त्यांनी कॉलनीलाच तिचं नाव दिलं. हा आमच्यासाठी अतिशय खास असा क्षण होता. आता लोक पत्ता सांगताना दीप्ती शर्मा कॉलनी, दीप्ती शर्मा रोड असं सांगतात’.
वर्ल्डकपमध्ये दीप्ती सध्या सर्वाधिक विकेट्स पटकावणाऱ्यांच्या यादीत अव्वल स्थानी आहे. सलामीच्या लढतीत श्रीलंकेविरुद्ध दीप्तीनेच भारतीय संघाला संकटातून बाहेर काढलं होतं. इंग्लंडविरुद्ध इंदूर येथे दीप्ती आणि स्मृती यांची जोडी भारतीय संघाला सहज जिंकून देणार असं चित्र होतं. मात्र या दोघी बाद झाल्या आणि भारताची घसरगुंडी उडाली. क्षेत्ररक्षण करताना बंदुकीची गोळी वाटावी असे थ्रो करून ती स्टंप्सचा वेध घेते आहे.
योगायोग म्हणजे दीप्तीची क्रिकेट कारकीर्द अशाच एक थ्रो पासूनच सुरू झाली होती. भाऊ खेळत असताना दीप्ती बाऊंड्रीच्या बाहेर उभं राहून पाहत होती. चेंडू तिच्या दिशेने आला. तिने तो उचलला आणि जोरात थ्रो केला. त्या थ्रो ने भारताचे माजी फलंदाज हेमलता काला यांचं लक्ष वेधलं. त्याही एकलव्य स्पोर्ट्स अकादमीत सराव करत होत्या.
दीप्ती सुमीतला बघून क्रिकेट खेळायला शिकली. सुमीत उत्तर प्रदेशातल्या वयोगट स्पर्धांमध्ये सहभागी होत असे. आठ वर्षांची असताना ती भावाबरोबर स्टेडियमला जाऊ लागली असं दीप्तीचे वडील भगवान शर्मा यांनी सांगितलं. भगवान शर्मा अलीकडेच रेल्वेतून निवृत्त झाले. नातेवाईक आणि शेजारीपाजारी आम्हाला सांगायचे, कुठे तुमच्या लेकीला स्टेडियममध्ये पाठवता? तिला डॉक्टर किंवा इंजिनियर करा. तिने अभ्यास करायला हवा. हा महिलांचा खेळ नाही, फक्त पुरुषांचाच आहे. आम्ही हे सगळं बोलणं ऐकणं टाळायचो. आता तीच मंडळी विचारतात की दीप्ती कधी येणार आहे? आम्हाला तिच्याबरोबर फोटो काढायचे आहेत असंही विचारतात.
सुमीत सांगतो, ‘आमच्या घरात क्रिकेट खेळणारा मी पहिलाच. माझे वडील सरकारी नोकरीत होते. आई शाळेत मुख्याध्यापक होती. भाई इंजिनियर झाले. मी कॉलनीत क्रिकेट खेळायचो, आईला फार पटायचं नाही. आई दरवाजे बंद करून ठेवायची. पण हे करूनही दिप्ती माझ्या मॅचेस पाहायला यायची. मी मॅच खेळून घरी परतायचो तेव्हा तिला माझ्या मॅचमध्ये काय झालं हे सगळं माहिती असायचं. तो कॅच सोडला नसता तर तुम्ही जिंकला असतात असं सगळं ती सांगायची’.
दीप्तीला क्रिकेटची ओढ यातूनच लागली. सुमीतच्या बरोबरीने ट्रेनिंगला जायला मिळावं यासाठी तिने वडिलांकडे आग्रह धरला. आठव्या वर्षी दीप्ती क्रिकेट किटबॅग घेऊन स्टेडियमला रोज जाऊ लागली. १७व्या वर्षी तिने भारतासाठी पदार्पण केलं. या प्रवासात डोमेस्टिक क्रिकेट खेळताना तिने संघाला असंख्य करंडक जिंकून दिले. सुरुवातीला उत्तर प्रदेश आणि त्यानंतर बंगालसाठी खेळताना ती संघाचा अविभाज्य भाग होत गेली. घराच्या समोरच्या भागातच दीप्तीने कमावलेल्या ट्रॉफीज मांडण्यात आल्या आहेत. दीप्तीची खरी कमाई तिथेच दिसून येते.
‘क्षेत्ररक्षणात ती सुरुवातीपासूनच प्रवीण होती. ऑलराऊंडर होण्याचं ध्येय तिने खूप आधीपासूनच बाळगलं होतं. एकच सामना तुम्ही तीन वेगवेगळ्या पातळ्यांवर खेळता. बाऊंड्रीवरूनही ती थेट स्टंप्सचा वेध घेते’, असं भगवान सांगतात. दीप्तीने मीडियम पेसर म्हणून सुरुवात केली. तिने फिरकीपटू व्हावं हा सुमीतचा निर्णय होता. तिने वरच्या क्रमांकावर फलंदाजीला जावं असं त्याला वाटायचं. दुखापतीमुळे तिला या तीन गोष्टी करण्यापासून रोखलं जावं असं त्याला वाटत नव्हतं.
सुमीत एकलव्य स्पोर्ट्स स्टेडियममध्ये सराव करत असे. मात्र ते घरापासून खूप लांब होतं. ‘जाण्यायेण्यातच ४ तास जायचे. आमच्याकडे मोपेड होती, ती किती वेगाने धावते तुम्हाला कल्पना आहेच. ४०पेक्षा जास्त वेगाने ती जाऊ शकत नाही’, असं सुमीतने सांगितलं.
दीप्तीच्या कारकिर्दीतला महत्त्वाचा निर्णय भाऊ सुमीतने घेतला. क्रिकेटमध्ये भवितव्य नाही असं सुमीतला वाटलं आणि त्याने एमबीएसाठी घर सोडलं. दीप्ती भारतासाठी खेळेल या आशेने त्याने त्याच्या क्रिकेटला पूर्णविराम दिला. सुमीतला कॅम्पस प्लेसमेंटच्या माध्यमातून नोकरी मिळाली. सुट्ट्यांच्या काळात तो घरी येत असे. त्यावेळी त्याच्या लक्षात आलं की दीप्तीचं वजन वाढलं आहे आणि त्यामुळे ती अपेक्षेनुसार सराव करू शकत नाही.
२०१२-१३ वर्षातली गोष्ट. उत्तर प्रदेश ते भारतीय संघ हे संक्रमण करायचं असेल तर तिला प्रचंड मेहनत करावी लागेल. मी बाबांना सांगितलं, ‘मला नोकरी सोडायची आहे. दीप्तीचा सराव होत नाहीये. त्यामुळे मी नोकरी सोडणं आवश्यक आहे असं मला वाटतं. नातेवाईक, शेजारी सांगायचे, मुलगी आहे तिला खेळवू नका. माझ्या बाबांनी कुणाचंच ऐकलं नाही. जेव्हा मी नोकरी सोडायचा निर्णय घेतला तेव्हाही ते भडकले नाहीत. त्यांनी मला पाठिंबा दिला. मला दिवसरात्र सराव करायचा आहे. आम्ही सकाळी गेलो तर आम्ही लगेच परतणार नाही. तुमच्या मुलाने चांगल्या पगाराची नोकरी का सोडली आणि घरा का बसला आहे असं तुम्हाला विचारलं जाईल. तयार राहा. त्यांनी मला हे कधीही विचारलं नाही. आमच्या मोठ्या भावांनीही त्यांना होकार भरला’.
नोकरी सोडल्यानंतर सुमीतने मला दोन वर्ष द्या असं आईवडिलांना आणि भावांना सांगितलं. ‘दोन वर्ष मेहनत करेन. काही झालं नाही पुन्हा नोकरी करेन. जे स्वप्न आहे ते साकारलं तर उत्तमच. नाही तर मी नोकरी शोधायला लागेन. दीप्ती क्रिकेटचं स्वप्न पूर्ण करू शकते’, असं सुमीतने सांगितलं.
भावाबहिणींच्या या जोडीने घराजवळच्या एका ठिकाणी अथक सराव केला. ३५वर्षीय सुमीत आता घराजवळच एक अकादमी चालवतो. घरातला चौथा मुलगा या नात्याने त्याला पालकांचा पाठिंबा मिळाला. दीप्ती भारतासाठी खेळेल हा विश्वास मनात जपत सुमीतने प्रचंड मेहनत घेतली.
आता जेव्हा दीप्ती भारतासाठी खेळते तेव्हा मीही भारतासाठी खेळतो असं सुमीत अभिमानाने सांगतो.