भारतीय संघाच्या नवीन प्रशिक्षकपदासाठी बीसीसीआयने अर्ज मागवले होते. ३० जुलैरोजी या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख होती. आतापर्यंत टॉम मूडी, रॉबिन सिंह, लालचंद राजपूत, माईक हेसन, गॅरी कस्टर्न यांनी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदासाठी तर प्रविण आमरे यांनी फलंदाजी प्रशिक्षक तर आफ्रिकन खेळाडू जॉन्टी ऱ्होड्सने क्षेत्ररक्षण प्रशिक्षकासाठी अर्ज दाखल केला आहे. या सर्व धामधुमीत भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनेही आपल्याला भारतीय संघाचं प्रशिक्षक बनायला आवडेल असं वक्तव्य केलं आहे.

“होय, एक दिवस मला भारतीय संघाचा प्रशिक्षक बनायला नक्की आवडेल, पण ती वेळ आता आलेली नाही. अजुन थोडा कालावधी जाऊ दे मी नक्की प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत उतरेन. सध्या मी आयपीएल, पश्चिम बंगाल क्रिकेट संघटना, समालोचन अशा विविध कामांमध्ये व्यस्त आहे. ही सर्व काम पार पाडल्यानंतर मी प्रशिक्षकपदासाठी नक्की अर्ज करेन.” सौरव गांगुली कोलकात्यात एका कार्यक्रमात बोलत होता.

सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर आणि व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांच्या अध्यक्षतेखालील क्रिकेट सल्लागार समितीकडे भारतीय संघाच्या प्रशिक्षक निवडीचे अधिकार देण्यात आले होते. मात्र बीसीसीआयने या तिन्ही खेळाडूंची समिती बरखास्त करत माजी कर्णधार कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि महिला क्रिकेटपटू शांता रंगास्वामी यांची समिती स्थापन केली. ही नवीन सल्लागार समिती यंदा भारतीय संघाचा प्रशिक्षक निवडणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अवश्य वाचा – विराटला चांगल्या प्रशिक्षकांची गरज, माजी पाकिस्तानी खेळाडूने दिला सल्ला