CM Devendra Fadnavis: मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आज शरद पवार स्टँड, रोहित पवार स्टँड, अजित वाडेकर स्टँड आणि एमसीएचे माजी अध्यक्ष अमोल काळे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ एमसीएच्या ऑफिस लाउंजचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चारही मान्यवरांबद्दल गौरवोद्गार काढले. तसेच एमसीएने प्रस्ताव दिल्यास एक लाख प्रेक्षक बसू शकतील, अशा क्षमतेचे भव्य क्रिकेट स्टेडियम राज्यात बांधू, अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीसांनी केली.

रोहित शर्मा यांच्या स्टँडचे उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोहित शर्मा यांच्या योगदानाचा उल्लेख केला. “रोहित शर्मा एक उत्कृष्ट फलंदाज आहेतच. त्याशिवाय ते एक चांगले कर्णधारही आहेत. लागोपाठ दोन महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने जिंकल्या. या स्पर्धांबद्दल क्रिकेट चाहत्यांच्या मनात अपूर्ण इच्छा होत्या, त्या त्यांनी पूर्ण केल्या. रोहित शर्मा यांचे मैदानावरील वागणे अतिशय मोकळे असते. त्यामुळेही त्यांची वेगळी अशी प्रतिमा निर्माण झाली. भारताच्या उत्कृष्ट कर्णधारांच्या मांदियाळीत रोहित शर्मा कधी जाऊन बसले, हे आपल्याला कळलेही नाही”, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“रोहित शर्मा यांनी सर्व फॉरमॅटमध्ये अतिशय सुंदर खेळ आपल्याला दाखवला. रोहित शर्मा यांचा एक शॉट कधी त्यांच्या नावाच्या स्टँडला जाऊन लागतो, याची आम्हाला उत्सुकता आहे. या क्षणाची सर्वच क्रिकेट चाहते वाट पाहत आहेत. एमसीएच्या इतिहासात पहिल्यांदाच विद्यमान खेळाडूचे नाव स्टँडला दिले जात आहे. हीदेखील एक दुर्मिळ गोष्ट आहे”, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

आमच्यासाठी वानखेडेच क्रिकेटची पंढरी

लॉर्ड्स ही क्रिकेटची पंढरी असल्याचे पूर्वी म्हटले जायचे. पण क्रिकेटची खरी पंढरी वानखेडे स्टेडियम आहे. पंढरी तिथे देव आणि क्रिकेटचा देव म्हणजे सचिन तेंडुलकर. त्यांचा पुतळा वानखेडे स्टेडियमध्ये आहे. क्रिकेटच्या पंढरीत आज जो सोहळा होत आहे, तो अतिशय महत्त्वाचा आहे, असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.

एक लाख प्रेक्षक बसतील असे स्टेडियम उभारू

वानखेडे स्टेडियमला ५० वर्ष पूर्ण होत आहेत. पुढचे ५० वर्ष वानखेडे हे आयकॉनिक स्टेडियम म्हणून गणले जाईल. पण मागच्या काळात अमोल काळे आणि एमसीएच्या पदाधिकाऱ्यांनी एक लाख प्रेक्षक बसू शकतील, असे स्टेडियम उभारण्याबद्दल चर्चा केली होती. मी आजच याठिकाणी सांगतो की, एमसीएने प्रस्ताव दिल्यास महाराष्ट्र सरकारच्या वतीने उचित जागा तुम्हाला दिली जाईल. किमान एक लाख लोक बसू शकतील असे स्टेडियम उभारू, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चार वर्षांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनला (एमसीए) १०० वर्ष पूर्ण होत आहेत. शताब्दीच्या निमित्ताने हे स्टेडियम पूर्ण होईल, असा प्रयत्न एमसीएने करावा, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.