नवी दिल्ली : जागतिक पॅरा ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या धरमवीर नैन याने ‘क्लब थ्रो’ प्रकारात रौप्य, तर अतुल कौशिकने ‘थाळीफेक’ प्रकारात कांस्यपदक मिळवले.
पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत सुवर्ण आणि पाठोपाठ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक जिंकणाऱ्या धरमवीरने पुरुषांच्या ‘एफ ५१’ विभागात क्लब थ्रो प्रकारात २९.७१ मीटर फेक करत रुपेरी यश मिळवले. सर्बियाचा ॲलेक्झांडर रॅडिसिच ३०.३६ मीटरच्या कामगिरीसह सुवर्णपदकाचा मानकरी ठरला. तटस्थ गटातील उलादझिस्ला हरिबने कांस्यपदक मिळवले. या स्पर्धा प्रकारातील भारताचा अन्य एक खेळाडू प्रणव सुरमा पाचव्या स्थानावर राहिला.
पुरुषांच्या ‘एफ ५७’ विभागातील थाळीफेक प्रकारात अतुलने ४५.६१ मीटरच्या फेकीसह कांस्यपदक मिळवले. लिबियाच्या महमूद रजब याने ४६.७३ मीटरच्या फेकीसह सुवर्णपदक पटकावले. युक्रेनचा मायकोला झबन्याक रौप्यपदकाचा मानकरी ठरला. भारतीय संघ सध्या चार सुवर्ण, पाच रौप्य आणि दोन कांस्यपदकांसह सातव्या स्थानावर आहे. ब्राझीलने १२ सुवर्ण, १७ रौप्य आणि ७ कांस्यपदकांसह आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. चीन (८, ९, १०) दुसऱ्या, तर पोलंड (७, २, ५) तिसऱ्या स्थानावर आहे.
दरम्यान, ‘एफ ३४’ विभागात पुरुषांच्या भालाफेक प्रकारात इराणच्या सय्यद अफरोजने ४१.५२ मीटरच्या नव्या जागतिक विक्रमासह सुवर्णपदक पटकावले. महिलांच्या ‘एफ ५७’ विभागातील गोळाफेक प्रकारात अल्जेरियाच्या सफिया जेलाल हिने ११.६७ मीटर फेक करताना स्वतःचाच ११.६२ मीटरचा जागतिक विक्रम मोडला.