वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णीने पाच बळी घेत बडोद्याला रणजी करंडक क्रिकेट स्पध्रेच्या तिसऱ्या दिवशी ९ बाद ३४५ धावसंख्येपर्यंत मर्यादेत ठेवले. बडोद्याचा संघ अद्याप १०२ धावांनी पिछाडीवर आहे. त्यामुळे पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर तीन गुण मिळवण्याची संधी मुंबईला असेल.
अखेरच्या सत्रात बडोद्याच्या फलंदाजांनी हाराकिरी पत्करल्यामुळे त्यांची पकड निसटली. मात्र १०व्या आणि ११व्या क्रमांकावरील फलंदाज मुर्तुजा व्होरा (२५*) आणि सागर माणगालोरकर (१५*) यांनी मुंबईच्या गोलंदाजांना झगडायला लावले. केदार देवधरने ८४ धावांवरून आपल्या खेळीला सकाळी प्रारंभ केला, मात्र त्याचे शतक पाच धावांनी हुकले. तर आदित्य वाघमोडेने ५७ धावांची खेळी साकारली. संक्षिप्त धावफलक : मुंबई (पहिला डाव) : ४४७ बडोदा (पहिला डाव) : १४० षटकांत ९ बाद ३४५ (देवधर ९५, धवल कुलकर्णी ५/६९)