ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन-डे मालिकेत भारतीय संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलणाऱ्या महेंद्रसिंह धोनीवर सध्या कौतुकाचा वर्षाव सुरु आहे. कांगारुंविरुद्ध 3 वन-डे सामन्यात 3 अर्धशतकं झळकावत धोनीने मालिकावीराचा किताब पटकावला. त्याच्या या खेळीवर ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू इयान चॅपल बेहद्द खुश आहेत. वन-डे क्रिकेटमध्ये अजुनही धोनीच सर्वोत्तम फिनीशर असल्याचं इयान चॅपल यांनी म्हटलं आहे.

अवश्य वाचा – Video : धोनी….धोनी…. जेव्हा मेलबर्नच्या मैदानात धोनीच्या नावाचा गजर होतो

“सामना जिंकवून देण्याची कला आजही धोनीकडे अवगत आहे, आणि त्याला यामध्ये कोणीही मात देऊ शकत नाही. सामन्यात गरजेनुसार धोनी आपली खेळी उभी करतो, म्हणजे त्याच्या डोक्यात अजुनही क्रिकेटचे विचार सुरु आहेत. काही वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाकडून मायकल बेवन अशाच प्रकारे आपल्या संघाला सामने जिंकवून द्यायचा. धोनी आजही भारतासाठी ते काम करतोय.” ESPNCricinfo या संकेतस्थळासाठी लिहीलेल्या लेखात चॅपल यांनी धोनीचं कौतुक केलं आहे.

आजही धावा काढताना धोनी ज्या पद्धतीने पळतो ते थक्क करुन सोडणारं आहे. माझ्यामते धोनी आणि बेवन यांच्यात तुलना करायची झाल्यास मी धोनीला अधिक पसंती देईन. यावर अनेकांची वेगळी मतं असू शकतात, मात्र माझ्यासाठी धोनी अजुनही वन-डे क्रिकेटचा सर्वोत्तम फिनीशर आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध वन-डे आणि टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अवश्य वाचा – न्यूझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघ ऑकलंडमध्ये दाखल