‘सहकाऱ्यांना पाणी देणारा खेळाडू’, अशी दिदियर देसचॅम्प्स यांची पूर्वीची ओळख. हरणे हे माझ्या स्वभावातच नाही, असे ते कायम सांगत. म्हणूनच कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच अनेक चढउतारांना सामोरे जात त्यांनी यशाची शिखरे गाठली. आपले कर्म आणि स्वकर्तृत्वावर विश्वास असणाऱ्या देसचॅम्प्स यांनी देशाला विजेतेपद मिळवून देण्याची सवय लावली. पण हळूहळू त्यांनी आपली खास ओळख निर्माण केली. आता संपूर्ण फ्रान्सवासीयांच्या आशा देसचॅम्प्स यांच्यावर खिळल्या आहेत.
देसचॅम्प्स हे फ्रान्सला एकमेव विश्वचषक जिंकून देणारे कर्णधार. त्यांच्या नेतृत्वाखालीच फ्रान्सने २००० साली युरोपियन चषकावर नाव कोरले. देसचॅम्प्स यांची कारकीर्द फक्त देशासाठी बहरली नाही तर क्लबसाठीही त्यांनी भरीव योगदान दिले. मार्सेइली आणि ज्युवेंट्स या क्लबना चॅम्पियन्स लीग चषक जिंकून देण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. प्रशिक्षकपदाच्या पहिल्याच भूमिकेत त्यांनी मोनॅको संघाला चॅम्पियन्स लीगच्या अंतिम फेरीत पोहोचवले. मार्सेईली संघाला १८ वर्षांनंतर पहिले फ्रेंच लीग जेतेपद जिंकून देणारे ते प्रशिक्षक ठरले.
१९९० आणि १९९४च्या विश्वचषकात फ्रान्सला मुख्य फेरीसाठी पात्र ठरता आले नाही. त्यामुळे युरोपातील या संघाकडून मायदेशात होणाऱ्या १९९८च्या विश्वचषकात देशवासीयांना मोठय़ा अपेक्षा होत्या. पण देसचॅम्प्स यांच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या फ्रान्सने इतिहास घडवला होता. अंतिम फेरीत ब्राझीलला पराभूत करून घरच्या मैदानावर फ्रान्सने पहिलावहिला विश्वचषक उंचावण्याची किमया केली होती. २००२मध्ये देसचॅम्प्सविना खेळणाऱ्या त्याच फ्रान्स संघाला झिनेदिन झिदानसारखा महान खेळाडू असूनही पहिल्या फेरीचा अडथळा पार करता आला नव्हता. २००६मध्ये फ्रान्सला दुसऱ्यांदा विश्वविजेतेपद पटकावण्याची संधी होती. पण झिदानच्या मूर्खपणामुळे फ्रान्सच्या हातातोंडाशी आलेला विजयाचा घास इटलीने हिरावून घेतला होता. तांत्रिकदृष्टय़ा सुमार खेळ आणि खेळाडूंच्या वागणुकीमुळे कायम संकटात सापडणाऱ्या फ्रान्सवर २०१०मध्ये पहिल्या फेरीतच बाहेर पडण्याची वेळ आली. म्हणूनच देसचॅम्प्स यांच्याकडे २०१२मध्ये प्रशिक्षकपदाची सूत्रे सोपवताना फ्रान्सने त्यांना सर्वाधिकार दिले होते. इतकेच नव्हे तर मायदेशात २०१६मध्ये होणाऱ्या युरोपियन चषकापर्यंत त्यांच्या प्रशिक्षकपदाला धोका पोहोचणार नाही, यासाठी त्यांना नोकरीची हमी देण्यात आली आहे. म्हणूनच फ्रान्ससाठी यशोगाथा लिहिण्याचे स्वप्न त्यांनी उराशी बाळगले.
दोन वर्षांच्या कालावधीतच त्यांनी फ्रान्स संघाची उत्तम बांधणी केली. रागावर नियंत्रण ठेवल्यास, सांघिक खेळ करतानाच खेळभावनेने कामगिरी केल्यास, फ्रान्सला हरवणे कठीण आहे, हेच देसचॅम्प यांनी खेळाडूंच्या मनावर बिंबवले. त्यामुळे खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणून एकही सामना न हरण्याचा विक्रम देसचॅम्प्स यांच्या नावावर आहे. विश्वचषक अभियानातील प्रमुख खेळाडू फ्रँक रिबरीने माघार घेतल्यानंतरही देसचॅम्प्स डगमगले नाहीत, तरीही त्यांनी क्लब स्तरावर चमक दाखवणाऱ्या समीर नासरीला संघात स्थान न देण्याचे धाडस दाखवले. त्याउलट पॉल पोग्बा आणि ब्लेस मतौडी यांच्यावर विश्वास दाखवला. करिम बेंझेमाला मनमोकळेपणाने खेळ करण्याची संधी दिली. त्यांचे फासे अचूक पडले आहेत. त्यामुळेच युवा खेळाडूंसह विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मार्गक्रमण करणाऱ्या देसचॅम्प्स यांचा अनुभव आता पणाला लागला आहे. पण फ्रान्सच्या फुटबॉलला नवी दिशा देणारे तेच खरे दीपस्तंभ आहेत.