French Open Tennis Tournament पॅरिस : फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या विजेतेपदासह विक्रमी २३वा ग्रँडस्लॅम जिंकणारा नोव्हाक जोकोव्हिच ‘एटीपी’ क्रमवारीत स्पेनच्या कार्लोस अल्कराझला मागे टाकत पुन्हा एकदा अग्रस्थानी पोहोचला आहे. ५० वर्षांहून अधिक काळापूर्वी सुरू झालेल्या संगणकीकृत क्रमवारीत सर्वाधिक काळ शीर्षस्थानी राहणारा पुरुष किंवा महिला खेळाडूचा विक्रम आपल्या नावे करणारा जोकोव्हिच आपल्या विक्रमात आणखी सुधार करेल.जोकोव्हिच फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेत तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू म्हणून सहभागी झाला होता.
मात्र, अंतिम सामन्यात कॅस्पर रूडला ७-६ (७-१), ६-३, ७-५ असे पराभूत करण्यात जोकोव्हिचला यश मिळाले. सध्या ‘एटीपी’ क्रमवारीत अल्कराझ दुसऱ्या आणि डॅनिल मेदवेदेव तिसऱ्या स्थानी आहे. तर रूडने आपले चौथे स्थान कायम ठेवले आहे. दुखापतींचा सामना करत असलेला स्पेनचा राफेल नदाल शीर्ष १०० खेळाडूंच्याही बाहेर फेकला गेला आहे. तो सध्या १३६व्या स्थानावर आहे.महिला एकेरीचे जेतेपद पटकावणारी पोलंडची इगा श्वीऑनटेक ‘डब्ल्यूटीए’ क्रमवारीत अग्रस्थानी कायम आहे.