Yuvraj Singh On Abhishek Sharma And Shubman Gill: आशिचा चषक २०२५ स्पर्धेसाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. या स्पर्धेची सुरूवात ९ सप्टेंबरपासून होणार आहे. तर भारतीय संघ आपला पहिला सामना १० सप्टेंबरला युएईविरूद्ध खेळणार आहे. या स्पर्धेत सूर्यकुमार यादव भारतीय संघाचा कर्णधार असणार आहे. तर युवा फलंदाज शुबमन गिलकडे भारतीय टी-२० संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या स्पर्धेत अभिषेक शर्मा डावाची सुरूवात करणार हे तर निश्चित आहे. पण दुसरा फलंदाज कोण? असा प्रश्न उपस्थित होत असताना गिलचं नाव पुढे येत आहे. दरम्यान ही स्पर्धा सुरू होण्याआधी भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगने अभिषेक शर्मा आणि शुबमन गिलला मोलाचा सल्ला दिला आहे.

युवराज सिंगने २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्यानंतर तो केवळ गोल्फ खेळताना दिसून आला आहे. आता युवराजने अभिषेक शर्मा आणि शुबमन गिलला गोल्फ खेळण्याचा सल्ला दिला आहे. गोल्फचा फलंदाजीत फायदा होतो, असं युवराज सिंगचं मत आहे.

एका कार्यक्रमात बोलताना युवराज सिंग म्हणाला, “मी जी चूक केली आहे, ती त्यांनी करू नये. मी त्यांना गोल्फ खेळायला सांगितलं आहे. मी त्यांना नेहमीच गोल्फ खेळण्यासाठी प्रोत्साहित करत असतो. वेळ काढणं खूप कठीण आहे. पण मला वाटतं ते आयपीएलदरम्यान वेळ काढून गोल्फ खेळू शकतात. ते या खेळातील सुपरस्टार आहेत, खेळात आणखी सुधारणा करण्यासाठी काय करावं, याचा त्यांनी विचार करायला हवा.”

तसेच तो पुढे म्हणाला की, ” मी सर्व खेळाडूंना गोल्फ खेळण्याचा सल्ला देतो. मला तरी हेच वाटतं की, हा तणाव दूर करण्याचा चांगला उपाय आहे. हे मानसिक स्वास्थासाठी देखील चांगलं आहे.” अभिषेक शर्माला घडवण्यात युवराज सिंगचा मोलाचा वाटा आहे. शुबमन गिल आणि अभिषेक शर्मा दोघेही पंजाब संघाच प्रतिनिधित्व करतात. दोघेही लहानपणापासून एकत्र खेळत आहेत. अभिषेक शर्मा हा टी-२० रँकिंगमध्ये अव्वल स्थानी आहे. तर दुसरीकडे शुबमन गिलकडे भारतीय कसोटी संघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर वनडे आणि टी-२० संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी देखील शुबमन गिलकडे आहे. गिलकडे भारतीय संघाच्या भविष्यातील तिन्ही फॉरमॅटचा कर्णधार म्हणून पाहिलं जात आहे.