‘‘मी आंतरराष्ट्रीय क्रिकेट नुकतेच सोडले आहे. प्रशिक्षक पद सांभाळायचे तर वर्षभर संघासोबत व्यस्त राहावे लागते. सध्या माझ्याकडे या गोष्टीसाठी पुरेसा वेळ नाही, कारण निवृत्तीनंतर आता मी मोकळेपणाने माझ्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे,’’ असे मत भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविडने व्यक्त केले.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करल्यानंतर द्रविडकडे भारताचा भावी प्रशिक्षक म्हणून पाहिले जात आहे. भारताचा माजी कप्तान आणि समालोचक सुनील गावस्कर यांनी नुकतीच प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांच्यावर टीकेची तोफ डागताना द्रविडला प्रशिक्षक करावे, असे सूतोवाच केले होते. या पाश्र्वभूमीवर द्रविड म्हणाला की, ‘‘राजस्थान रॉयल्सला मी येत्या आयपीएल हंगामात मार्गदर्शन करणार आहे. त्यानंतर भारतीय युवा संघ, भारतीय ‘अ’ संघाचे प्रशिक्षक पद सांभाळून मगच भारताच्या वरिष्ठ संघासाठी ही महत्त्वाची जबाबदारी सांभाळणे योग्य ठरेल. त्यामुळे सध्या तरी मी भारताचे प्रशिक्षक पद स्वीकारू शकणार नाही.’’
आयपीएलच्या सातव्या हंगामात द्रविड राजस्थान रॉयल्सचा मार्गदर्शक म्हणून कार्यरत असेल. आपल्या नव्या जबाबदारीविषयी तो म्हणाला, ‘‘खेळाडूंना मार्गदर्शन करणे, मदत करणे तसेच संघाची रणनीती ठरवणे अशा भूमिका माझ्याकडे असतील. या वर्षी देशात आणि परदेशात असे दोन्ही ठिकाणी सामने होणार आहेत. त्यामुळे त्या-त्या वातावरणानुसार संघाचा विचार करावा लागणार आहे. गेल्या काही वर्षांत राजस्थान रॉयल्स संघाशी माझे चांगले नाते जुळले आहे. राजस्थानच्या नेतृत्वाचा चांगला अनुभव माझ्याकडे आहे. त्यामुळे याच खेळाडूंसोबत खेळत आलो आहे.’’
बांगलादेशमध्ये येत्या रविवारपासून ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पध्रेला प्रारंभ होत आहे. या स्पध्रेतील भारताच्या कामगिरीविषयी द्रविडने सांगितले की, ‘‘भारतीय संघाला ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकून देऊ शकतील, असे खेळाडू आहेत. याचप्रमाणे अनुभवी ट्वेन्टी-२० खेळाडूसुद्धा संघात समाविष्ट आहेत. याशिवाय या सर्व खेळाडूंच्या गाठीशी आयपीएलचाही अनुभव आहे, परंतु या स्पध्रेतील अनेक संघ ताकदवान असल्यामुळे भारतासाठी आव्हान नक्कीच कठीण आहे. त्यामुळे भारताला आपली प्रतिष्ठा पणाला लावावी लागणार आहे. भारतीय संघात महेंद्रसिंग धोनी, युवराज सिंग यांच्यासारखे सामना जिंकून देऊ शकणारे खेळाडू आहेत. अशा काही खेळाडूंची कामगिरी दमदार झाली, तर भारताला नक्की चांगले यश मिळू
शकते.’’
भारतीय संघाची गेल्या काही महिन्यांत कामगिरी समाधानकारक झालेली नाही. या संघाकडून ऑस्ट्रेलियात २०१५मध्ये होणाऱ्या विश्वचषक स्पध्रेतील जेतेपदाची आशा बाळगता येईल का, या प्रश्नाला उत्तर देताना द्रविड म्हणाला की, ‘‘आताच्या कामगिरीवरून पुढचे भवितव्य मांडणे चुकीचे ठरेल. येत्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात भारताची कामगिरी चांगली व्हायला हरकत नाही. काही घटनांमुळे क्षणार्धात सारे काही बदलते. पुढील सहा महिन्यांनंतर भारताची कामगिरी पाहा. त्या चांगल्या कामगिरीनिशी आपण एकदिवसीय विश्वचषकाकडे सकारात्मक पद्धतीने पाहू शकतो.’’  मुंबईत जिलेटच्या ‘इनर स्टील’ या खास रेझरचे शुक्रवारी अनावरण करण्यात आले. या वेळी भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर आणि कसोटीपटू चेतेश्वर पुजारा उपस्थित होते.