फुटबॉल वर्तुळात प्रतिष्ठेच्या युरो अर्थात युरोपियन अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धा २०१६ स्पर्धेची गटवारी जाहीर झाली आहे. २०१२ साली स्पेनने या स्पर्धेच्या जेतेपदावर कब्जा केला होता. सलग तिसऱ्या वेळी स्पेन नव्या अभियानाची सुरुवात करणार असून, त्यांच्यापुढे युक्रेन, स्लोव्हाकिया, बेलारुस, मॅसेडोनिया आणि लक्सेंबर्ग यांचे आव्हान असणार आहे.
 गेल्या वेळी उपविजेतेपदावर समाधान मानावे लागलेल्या इटलीला गटवार लढतीत क्रोएशिया, नॉर्वे, बल्गेरिया, अझरबैजान आणि माल्टा यांचा मुकाबला करावा लागणार आहे. जिब्राल्टर या नव्या देशाचा युरोमध्ये समावेश झाला असून, त्यांच्यासमोर बलाढय़ जर्मनी, पोर्तुगाल, पोलंड, स्कॉटलंड आणि जॉर्जिआ यांचे आव्हान असणार आहे. अ गटात सगळ्यात तुल्यबळ मुकाबला रंगणार आहे. नेदरलॅण्ड्स, चेक प्रजासत्ताक, तुर्की, लॅटव्हिआ, आइसलॅण्ड आणि कझाकिस्तान यांच्यात पुढील फेरी गाठण्यासाठी चुरस असणार आहे. इ गटामध्ये इंग्लंड आणि स्वित्र्झलड आमनेसामने असणार आहेत. सध्या इंग्लंडचे प्रशिक्षक असणारे रॉय हॉजसन पूर्वी स्वित्र्झलडचे प्रशिक्षक होते. स्वित्र्झलडला नमवण्यासाठी इंग्लंडला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल, असे हॉजसन यांनी सांगितले.


जागतिक सवरेतम खेळाडूचा मान पटकावणाऱ्या ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या पोर्तुगालच्या गटात डेन्मार्क, सर्बिया, अर्मेनिया आणि अल्बानिया असणार आहेत. प्रत्येक गटातील अव्वल आणि दुसऱ्या स्थानावरील संघ तसेच सर्वोत्तम तृतीय स्थानावरील संघ स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील. अन्य आठ गटांतील तृतीय स्थानावरील संघ अंतिम फेरीतील चार जागांसाठी प्लेऑफच्या लढती खेळतील. १३ महिने चालणाऱ्या पात्रता फेरीला सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे.