Suresh Raina and Shikhar Dhawan Assets Attaches: अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) 1xBet प्लॅटफॉर्मशी संबंधित मनी लाँडरिंग प्रकरणात सुरेश रैना आणि शिखर धवन यांची काही महिन्यांपूर्वी चौकशी केली होती. त्यानंतर आता दोघांच्या ११.१४ कोटी रुपयांच्या जंगम आणि स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्तीमध्ये सुरेश रैनाची ६.६४ कोटी रुपयांची म्युच्युअल फंड गुंतवणूक तसेच शिखर धवनच्या नावावर ४.५ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता समाविष्ट आहे.

सप्टेंबर महिन्यात या प्रकरणात ईडीने सुरेश धवन, सुरेश रैना, युवराज सिंग आणि रॉबिन उथप्पा यांचे जबाब नोंदवले होते. ईडीच्या प्रवक्त्याने एका निवेदनात म्हटले की, बेकायदेशीर ऑफशोअर बेटिंग प्लॅटफॉर्म 1xBet च्या संचालकांविरुद्ध अनेक राज्यात पोलिसांनी एफआयआर नोंदवले होते. त्यावर आधारित पीएमएलए कायद्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

ईडीच्या तपासात आढळून आले की, शिखर धवन आणि सुरेश रैना आणि इतरांनी 1xBet आणि त्यांच्या सरोगेट्स ब्रँड्ससाठी जाहिराती केल्या. यासाठी विदेशी संस्थाबरोबर एंडोर्समेंट करार केले. ईडीच्या प्रवक्त्याने म्हटले, एंडोर्समेंट करार विदेशी संस्थांद्वारे पाठलेल्या पैशांच्या बदल्यात केले गेले. जेणेकरून निधीचा बेकायदेशीर स्त्रोत लपवून ठेवता येईल. या जाहिरातींद्वारे प्लॅटफॉर्मचा प्रचार झाला असा आरोप ईडीने केला आहे.

1xBet आणि त्यांचे सरोगेट ब्रँड 1xBat, 1xbat स्पोर्टिंग लाइन्सकडून संपूर्ण भारतात बेकायदेशीर ऑनलाइन बेटिंग आणि जुगाराला प्रोत्साहन देण्याचे काम केले, असाही आरोप ईडीच्या प्रवक्त्यांनी केला. 1xBet कडून भारतात विनापरवानगी बेटिंगचा उद्योग चालवला जात होता. तसेच त्यांच्या सरोगेट ब्रँडकडून सोशल मीडिया, ऑनलाइन व्हिडीओ आणि प्रिंट मीडियाच्या माध्यमातून जाहिराती केल्या जात होत्या.

तपासाचा भाग म्हणून ईडीने युवराज सिंग आणि रॉबिन उथप्पा यांसारख्या माजी क्रिकेटपटूंसह अभिनेता सोनू सूद, अभिनेत्री उर्वशी रौतेला, मिमी चक्रवर्ती (तृणमूल काँग्रेसच्या माजी खासदार) आणि अंकुश हाजरा (बंगाली अभिनेता) यांचीही चौकशी केली आहे.