इजिप्त, इथिओपिया, आयव्हरी कोस्ट, टय़ुनिशिया आणि अल्जेरिया या देशांनी २०१४मध्ये ब्राझील येथे रंगणाऱ्या फिफा विश्वचषक स्पर्धेच्या पात्रता फेरीत आफ्रिका गटातून ‘प्ले-ऑफ’ फेरीत स्थान मिळवले आहे.
या वर्षीच्या पात्रता फेरीत इथिओपिया, इक्वेटोरियल गिनिया आणि टोगो या देशांनी अपात्र खेळाडूंना संधी दिल्याची चौकशी सध्या सुरू आहे. या प्रकरणी एखादा संघ दोषी आढळल्यास त्यांनी या सामन्यातून कमावलेले गुण वजा केले जातील आणि प्रतिस्पर्धी संघाला ३-० असे विजयी घोषित केले जाईल. इथिओपियाचा बोत्सवानावरील २-१ने विजय, टोगोचा कॅमेरूनवरील २-०ने विजय तर इक्वेटोरियल गिनियाची केप वेर्डे आयलँडवर ४-३ने मात या तीन सामन्यांची चौकशी सध्या सुरू आहे. या तिन्ही संघांनी तीन गुण गमावल्यास, त्यांची गटातील अव्वल स्थानावरून गच्छंती होईल.
रविवारी झालेल्या सामन्यांत, बेर्नार्ड पार्करच्या चुकीमुळे इथिओपियाने २०१०मधील विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भूषविलेल्या दक्षिण आफ्रिकेवर २-१ असा विजय मिळवला. एक सामना शिल्लक राखून इथिओपियाने अ गटात पाच गुणांच्या फरकाने अव्वल स्थान काबीज केले आहे. मोहम्मद सालेहच्या एकमेव गोलमुळे इजिप्तने मोझाम्बिके संघावर १-० अशी मात केली. आफ्रिकेतील सर्वोत्तम फुटबॉलपटूचा पुरस्कार पटकावणाऱ्या याया टौरेच्या दोन गोलमुळे आयव्हरी कोस्टने टांझानियाचे आव्हान ४-२ असे परतवून लावले. ब गटात अव्वल स्थान पटकावण्यासाठी टय़ुनिशियाला एका गुणाची गरज होती. इक्वेटोरियल गिनिआविरुद्ध १-१ अशी बरोबरी साधून टय़ुनिशियाने अव्वल स्थान प्राप्त केले.
अल्जेरियाने रवान्डा संघावर १-० असा विजय मिळवला. गेल्या विश्वचषक स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठणाऱ्या घाना संघाने लेसोथोवर २-० अशी मात करून ‘प्ले-ऑफ’ फेरीच्या दिशेने पाऊल टाकले आहे.