* महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या ६ जागांसाठी चुरस
* प्रतिष्ठेच्या सरकार्यवाह पदासाठी रमेश देवाडिकर यांचे गणेश शेट्टी यांना आव्हान
* संयुक्त कार्यवाह पदासाठी सात जणांमध्ये तगडी चुरस
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या पंचवार्षिक निवडणुकीचा अखेरचा अंक आज शिवाजी पार्कवर रंगणार आहे. संघटनेची संलग्न असलेल्या २४ जिल्ह्यांचे ७२ प्रतिनिधी आपला मतदानाचा हक्क बजावून एक सरकार्यवाह आणि पाच संयुक्त कार्यवाह निश्चित करतील. कबड्डी विकास आघाडी निर्विवाद बहुमताकडे वाटचाल करीत असताना ही लाट थोपविण्याचे महत्त्वाचे आव्हान गणेश शेट्टी (सांगली), विश्वास मोरे (मुंबई) आणि रवींद्र देसाई (रत्नागिरी) यांच्यावर असणार आहे. आतापर्यंत बिनविरोधपणे निवड झालेल्या आठ जागांपैकी सात जागांवर कबड्डी विकास आघाडीने आपले उमेदवार निवडून आणले आहेत. त्यामुळे रविवारच्या अखेरच्या निर्णायक चढाईत काय चित्र दिसेल, याची कबड्डीजगतामध्ये मोठी उत्सुकता आहे.
नवनिर्वाचित अध्यक्ष किशोर पाटील आणि कार्याध्यक्ष डॉ. दत्ता पाथरीकर यांच्या नेतृत्वाखाली रमेश देवाडिकर यांनी ठाणे, कोल्हापूर, नाशिक यांच्यासहित मराठवाडय़ाच्या जिल्ह्यांना एकत्रित घेऊन कबड्डी विकास आघाडीची मोट बांधली. गेले काही महिने महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या निवडणुकीसाठी सुव्यस्थित आखणी करणाऱ्या या आघाडीला अखेरची लढाई जिंकणे आता प्रतिष्ठेचे झाले आहे. सरकार्यवाह पदासाठी रमेश देवाडिकर यांना गणेश शेट्टी यांचे खंदे आव्हान आहे. कागदावर देवाडिकर यांचे स्थान बळकट दिसत असले तरीही शेट्टी चमत्कार घडवू शकतात, असे कबड्डी जाणकारांचे म्हणणे आहे. संयुक्त कार्यवाह पदासाठी सुनील जाधव, प्रकाश बोराडे, मुजफ्फर अली अब्बास अली सय्यद, उत्तमराव इंगळे आणि मंगल पांडे कबड्डी विकास आघाडीच्या पाच उमेदवारांचे आव्हान विश्वास मोरे आणि रवींद्र देसाई यांच्यापुढे असेल.
कबड्डीचे राजकीय मतदार!
रविवारी होणाऱ्या महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावणाऱ्या विविध जिल्ह्यांच्या प्रतिनिधींमध्ये राजकीय मंडळींची संख्या अधिक आहे. संघटनेचे माजी अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्याचे प्रतिनिधी म्हणून मतदान करणार आहेत. पवार यंदा प्रथमच निवडणूक प्रक्रियेत व्यक्तिश: सहभागी नसले तरी त्यांचे संघटनेवर अजूनही नियंत्रण आहे. उपाध्यक्षपदावर बिनविरोधपणे दावा करणारे आमदार किरण पावसकर हे राष्ट्रवादीचेच. आणखी एक उपाध्यक्ष बाबुराव चांदेरे हेसुद्धा पुण्यातील राजकीय प्रस्थ. मुंबईचे प्रतिनिधित्व करणारे भाई जगताप काँग्रेसचे आमदार, तर उपनगरचे प्रतिनिधी गजानन कीर्तिकर हे शिवसेनेचे नेते. याशिवाय ठाण्याचे देवराम भोईर, रायगडचे जयंत पाटील, रत्नागिरीचे रमेश कदम, सिंधुदुर्गचे दीपक केसरकर, सांगलीचे मदन पाटील, नवे कार्याध्यक्ष जालन्याचे दत्ता पाथरीकर, नवे अध्यक्ष औरंगाबादचे किशोर पाटील, परभणीचे सुरेश जाधव, धुळ्याचे राजवर्धन कदमबांडे, सांगलीचे नितीन शिंदे आदी अनेक मंडळींच्या मागे राजकीय पाश्र्वभूमी आहे.
निवडणूक प्रक्रिया
मतदानाची तारीख : २८ एप्रिल २०१३
वेळ : सकाळी ११ ते दुपारी १ वाजेपर्यंत
मतमोजणी व निकाल : दुपारी ३ वाजता
निवडणूक : ६ जागांसाठी
उमेदवार : ९
मतदार : २४ जिल्ह्यांचे ७२ प्रतिनिधी
सरकार्यवाह (१ पद) : रमेश देवाडिकर (ठाणे), गणेश शेट्टी (सांगली)
संयुक्त कार्यवाह (५ पदे) : विश्वास मोरे (मुंबई), रवींद्र देसाई (रत्नागिरी), सुनील जाधव (अहमदनगर), प्रकाश बोराडे (नाशिक), मुजफ्फर अली अब्बास अली सय्यद (धुळे), उत्तमराव इंगळे (हिंगोली), मंगल पांडे (परभणी)
संग्रहित लेख, दिनांक 28th Apr 2013 रोजी प्रकाशित
आज फैसला!
* महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या ६ जागांसाठी चुरस * प्रतिष्ठेच्या सरकार्यवाह पदासाठी रमेश देवाडिकर यांचे गणेश शेट्टी यांना आव्हान * संयुक्त कार्यवाह पदासाठी सात जणांमध्ये तगडी चुरस महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या पंचवार्षिक निवडणुकीचा अखेरचा अंक आज शिवाजी पार्कवर रंगणार आहे.
First published on: 28-04-2013 at 01:34 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Election result today