पॅरिस : जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या अरिना सबालेन्काने फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेला झोकात सुरुवात केली. एलिना स्वितोलिना आणि ऑलिम्पिक विजेती चीनची झेंग क्वीनवेनने देखिल पहिल्या फेरीचा अडथळा पार केला.
पहिल्या फेरीच्या लढतीत रविवारी सबालेन्काने रशियाच्या कॅमिला राखीमोवाचा ६-१, ६-० असा सहज पराभव केला. फ्रेंच स्पर्धेतील पहिल्या विजेतेपदासाठी उत्सुक असलेल्या सबालेन्काने लढतीत राखीमोवाची सर्व्हिस तब्बल पाचवेळा भेदली.
महिला एकेरीच्या अन्य लढतीत युक्रेनच्या स्वितोलिनाने तुर्कीच्या झीनेप सोनमेझचा अवघ्या तासाभराच्या लढतीत ६-१, ६-१ असा पराभव केला. तेराव्या मानांकित असलेल्या स्वितोलिनाने यापूर्वी चारवेळा या स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. चीनची ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती झेंग क्विनवेन हिने सनसनाटी निकाल नोंदवताना माजी उपविजेत्या अॅनास्तासिया पावल्युचेन्कोवाचे आव्हान ६-४, ६-३ असे परतवून लावले.
पुरुष एकेरीत लॉरेंझो मुसेट्टीने जर्मनीच्या यानिक हॉफमनला ७-५, ६-२, ६-० असे सरळ सेटमध्ये नमविले. तर, अमेरिकेच्या १५व्या मानांकित फ्रान्सिस टियाफोने रोमन साफिऊल्लिनवर ६-४, ७-५, ६-४ असा विजय मिळवला.
नदालचा खास गौरव सोहळा
फ्रेंच टेनिस स्पर्धा संयोजकांनी सर्वाधिक १४ विजेतीपदे मिळविणाऱ्या राफेल नदालसाठी खास निरोप सोहळ्याचे आयोजन केले होते. या सोहळ्यात फ्रेंच टेनिस महासंघाच्या वतीने नदालचा सन्मान करण्यात आला. फिलिपे चार्टर या सेंटर कोर्टवर झालेल्या या सन्मान सोहळ्यासाठी उपस्थित टेनिस खेळाडू आणि प्रेक्षकांनी यावेळी नदालला उभे राहून टाळ्यांच्या गजरात मानवंदना दिली. नदालने या सोहळ्यात प्रेक्षकांना संबोधित करताना रोलँड गॅरो हे आपले दुसरे घरच असल्याचे सांगितले. या घरात गौरव होताना काहीसे वेगळेच वाटत आहे. येथे खेळलेला प्रत्येक क्षण माझ्या मनात कायम कोरला गेल्याचे सांगितले.