केनिंग्टन ओव्हल मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यात चौथा कसोटी सामना रंगत आहे. भारताने आपल्या दुसऱ्या डावात दमदार फलंदाजी करत इंग्लंडला हैराण केले. लोकेश राहुल आणि रोहित शर्मा यांनी अर्धशतकी सलामी दिली. या डावात राहुलला त्याचे अर्धशतक पूर्ण करता आले नाही. अवघ्या चार धावांनी त्याचे अर्धशतक हुकले. राहुलने केलेल्या एका चुकीमुळे त्याला मोठी शिक्षा मिळाली आहे.

चौथ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी पंचांच्या निर्णयाशी सहमत नसल्याबद्दल राहुलला त्याच्या सामना शुल्काच्या १५ टक्के दंड ठोठावण्यात आला. भारतीय डावाच्या ३४ व्य षटकात राहुलला जेम्स अँडरसनने बाद केले. डीआरएस घेतल्यानंतर राहुलला तंबूत परतावा लागले. यानंतर राहुलने पंचांच्या निर्णयाला असहमती दर्शवली. अशाप्रकारे, त्याने आयसीसी (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद) च्या आचारसंहितेच्या लेवल एकचे उल्लंघन केले आहे. राहुलने १०१ चेंडूत ४६ धावा केल्या होत्या.

 

हेही वाचा – ENG vs IND : शानदार, जबरदस्त, झिंदाबाद..! विदेशी भूमीवर रोहितचं पहिलं शतक; पाहा VIDEO

आयसीसीनुसार, “राहुल आयसीसीच्या आचारसंहितेच्या कलम २.८च्या उल्लंघनासाठी दोषी आढळला आहे. हे कलम आंतरराष्ट्रीय सामन्यात पंचांच्या असहमत मताशी संबंधित आहे. या व्यतिरिक्त, राहुलच्या शिस्तभंगाच्या रेकॉर्डमध्ये एक डिमेरिट पॉइंट देखील जोडला गेला आहे, हे राहुलने २४ महिन्यांत पहिले उल्लंघन आहे.”

राहुलने आपली चूक कबूल केली असून आयसीसी एलिट पॅनलचे मॅच रेफरी ख्रिस ब्रॉड यांच्या माध्यमातून प्रस्तावित दंड स्वीकारला आहे. त्यामुळे आता अधिकृत सुनावणीची गरज नाही. मैदानावरील पंच रिचर्ड इलिंगवर्थ आणि अॅलेक्स व्हार्फ, तिसरे पंच मायकेल गॉफ आणि चौथे पंच माइक बर्न्स यांनी आरोप निश्चित केले.