भारत-इंग्लंड कसोटी मालिका रंगतदार असली तरी उपकर्णधार अजिंक्य रहाणेसाठी ती एका वाईट स्वप्नासारखीच ठरली आहे. रोहित-राहुल हे फलंदाज भन्नाट फॉर्मात होते, तर पुजारा आणि विराट लयीत येताना दिसले. मात्र मधल्या फळीतील रहाणे आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करू शकला नाही. त्याच्यावर चहुबाजूंनी खूप टीका झाली. भारताचा माजी सलामीवीर फलंदाज वीरेंद्र सेहवागने त्याच्याबाबत एक रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे.

सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर चर्चा करताना सेहवाग म्हणाला, ”मला असे वाटते की जेव्हा तुमचा परदेश दौरा खराब होतो, तेव्हा तुम्हाला भारतातही संधी मिळायला हवी, कारण ही चार वर्षांतून एकदा येते. तुम्ही दरवर्षी भारतात मालिका खेळता. जर भारतात मालिका खराब झाली, तर मी समजू शकतो की परदेशात जो फॉर्म खराब होता तो इथेही आहे. मी असे अनेक महान खेळाडू पाहिले आहेत ज्यांनी ८ किंवा ९ कसोटी सामन्यात काही केलेले नाही, तरीही ते टिकून राहिले आणि त्याचा परिणाम असा झाला की त्यांनी पुढे जाऊन कामगिरी केली आणि कसोटी क्रिकेटमध्ये एका वर्षात १२००-१५०० धावा केल्या.”

हेही वाचा – IPL 2021 : मुंबई इंडियन्स आणि मुलासाठी सचिन पोहोचला यूएईला, हॉटेल गाठल्यावर म्हणतो…

“प्रत्येकजण वाईट टप्प्यातून जातो. प्रश्न असा आहे, की तुम्ही तुमच्या खेळाडूशी वाईट टप्प्यात कसे वागता, तुम्ही त्याला पाठीशी घालता किंवा त्याला सोडून देता. माझ्या मते, पुढील मालिका भारतात होईल तेव्हा अजिंक्य रहाणेला संधी मिळाली पाहिजे. जर तो तिथे कामगिरी करत नसेल, तर तुम्ही त्याला तुझ्या योगदानाबद्दल थँक्यू म्हणू शकता”, असे सेहवागने म्हटले.

रहाणेची कामगिरी

अजिंक्य रहाणे या मालिकेच्या ७ डावांमध्ये फक्त १०९ धावा (५, १, ६१, १८, १०, १४, ०) करू शकला आहे. लॉर्ड्स कसोटीच्या दुसऱ्या डावात त्याने ६१ धावा केल्या. तेव्हापासून त्याला मालिकेत मोठी धावसंख्या करता आली नाही. यामुळे त्याच्या कसोटी सरासरीवरही परिणाम झाला आहे. रहाणेची फलंदाजीची सरासरी २०१५च्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेपासून (५९ कसोटी) ४०च्या खाली पोहोचली आहे. इंग्लंड दौऱ्यावर अनेक वेळा टीम इंडियाला मधल्या फळीत त्याच्यामुळे फटका सहन करावा लागला आहे..