England Announces Playing XI For Manchester Test vs India: भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा कसोटी सामना उद्या म्हणजेच २३ जुलैपासून मँचेस्टरच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. यजमान इंग्लंडचा संघ या कसोटी मालिकेत २-१ ने आघाडीवर आहे. त्यामुळे चौथा कसोटी सामना मालिकेच्या निकालाच्या दृष्टीने भारतासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. दरम्यान इंग्लंडने एक दिवस आधीच मँचेस्टर कसोटीसाठी प्लेईंग इलेव्हन जाहीर केली आहे, ज्यामध्ये नव्या खेळाडूला ताफ्यात संधी दिली आहे.
लॉर्ड्स कसोटीत भारताला अवघ्या २२ धावांनी पराभव पत्करावा लागला. भारताच्या खालच्या फलंदाजी फळीने संघाचा डाव सावरून धरला होता, पण संघाचं नशीब मात्र खराब होतं आणि परिणामी पराभव पत्करावा लागला. दरम्यान आता इंग्लंडच्या संघाने चौथ्या कसोटीसाठी एक दिवस आधीच प्लेईंग इलेव्हन जाहीर करत त्यात मोठा बदल केला आहे.
लॉर्ड्स कसोटीच्या तिसऱ्या दिवशी रवींद्र जडेजाचा ड्राइव्ह थांबवण्याचा प्रयत्न करताना शोएब बशीरच्या डाव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली होती. त्याच्या बोटाला आता फ्रॅक्चर झाल्याने बशीर संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला आहे. शोएब बशीरने सिराजला क्लीन बोल्ड करत संघाला अखेरची विकेट मिळवून दिली होती.
कोण आहे लियाम डॉसन?
इंग्लंडने शोएब बशीरच्या जागी लियाम डॉसनला संधी दिली आहे. लियाम डॉसन हा फिरकी अष्टपैलू खेळाडू आहे. ८ वर्षांनी आणि १०२ कसोटी सामन्यांनंतर डॉसन संघात परतला असून २०१७ नंतर तो इंग्लंडसाठी एकही कसोटी खेळलेला नाही. १०० पेक्षा जास्त कसोटी सामन्यांना मुकल्यानंतरही राष्ट्रीय संघासाठी कसोटी सामना खेळणारा डॉसन हा ७वा खेळाडू आहे.
सर्वाधिक कसोटी सामन्यांना मुकल्यानंतर पुन्हा प्लेईंग इलेव्हनमध्ये परतण्याचा विक्रम इंग्लिश फिरकी गोलंदाज गॅरेथ बॅटीच्या नावावर आहे. २००५ ते २०१६ दरम्यान बॅटीने इंग्लंडसाठी १४२ कसोटी सामने खेळले नव्हते. विशेष म्हणजे, बॅटीने शेवटचा कसोटी सामना २०१६ मध्ये भारताविरुद्ध त्याच मालिकेत खेळला होता, ज्यामध्ये डॉसनने पदार्पण केले होते.
लक्षवेधी गोष्ट म्हणजे डॉसनच्या पदार्पणाच्या कसोटीत करुण नायरने भारतासाठी त्रिशतक झळकावले होते. डॉसनचा संघात समावेश केल्याने आता इंग्लंडची फलंदाजी अधिक मजबूत झाली आहे. ख्रिस वोक्स ९ व्या क्रमांकावर खेळेल आणि गेल्या सामन्यात अर्धशतक झळकावणारा ब्रायडन कार्स १०व्या फलंदाजीला उतरेल.
इंग्लंडने चौथ्या कसोटीसाठी जाहीर केली प्लेईंग इलेव्हन
जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स, जेमी स्मिथ, लियाम डॉसन, ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोफ्रा आर्चर.