IND vs ENG 3rd T20I Highlights in Marathi: इंग्लंड संघाने राजकोटमधील भारत वि इंग्लंड तिसऱ्या टी-२० सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा धक्का दिला. इंग्लंडच्या गोलंदाजांनी तिसऱ्या टी-२० सामन्यात चांगली गोलंदाजी करत भारताच्या धावांवर अंकुश ठेवला आणि फलंदाजांना झटपट बाद करत मोठे फटके खेळण्याची संधी दिली नाही. अशारितीने इंग्लंडने दोन पराभवांनंतर चांगलं पुनरागमन करत मालिकेत आपलं खातं उघडलं आहे.

१७२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाकडून अत्यंत खराब फलंदाजी पाहायला मिळाली. भारताचे दोन्ही सलामीवीर चांगली सुरूवात केल्यानंतर स्वस्तात बाद झाले. सलामीवीर संजू सॅमसनला ६ चेंडूत केवळ ३ धावा करता आल्या. त्याचवेळी अभिषेक शर्माही १४ चेंडूत २४ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. यावेळीही कर्णधार सूर्यकुमार यादवला केवळ १४ धावाच करता आल्या.

दुसरीकडे, तिलक वर्माने १४ चेंडूत १८ धावा केल्या. हार्दिक पंड्याने ३५ चेंडूत ४० धावा केल्या पण संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. वॉशिंग्टन सुंदरनेही ६ तर अक्षर पटेलने केवळ ५ धावा केल्या. त्यामुळे भारतीय संघ २० षटकांत ९ विकेट गमावून केवळ १४५ धावा करू शकला आणि २६ धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले.

टीम इंडियाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अर्शदीप सिंगच्या ऐवजी या सामन्यात मोहम्मद शमीला संधी देण्यात आली. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत चांगली धावसंख्या उभारली. सलामीवीर बेन डकेटने या सामन्यात आपल्या संघासाठी सर्वात मोठी खेळी खेळली. त्याने २८ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांसह ५१ धावा केल्या. लियाम लिव्हिंगस्टननेही २४ चेंडूत ४३ धावांची तुफानी खेळी केली. त्याचवेळी आदिल रशीद आणि मार्क वूड यांनीही प्रत्येकी १० धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसरीकडे, वरुण चक्रवर्ती हा भारताकडून सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. या सामन्यात वरुण चक्रवर्तीने ४ षटकांच्या स्पेलमध्ये ६.०० च्या इकॉनॉमीसह केवळ २४ धावा दिल्या आणि ५ विकेट घेतले. हार्दिक पांड्यानेही 2 फलंदाजांना बाद करण्यात यश मिळवले. याशिवाय रवी बिश्नोई आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.