ENG vs ZIM 4 Day Test Rules: भारतात आयपीएल २०२५ स्पर्धेचा थरार सुरू आहे. ही स्पर्धा सध्या शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. तर दुसरीकडे इंग्लंड आणि झिम्बाब्वे या दोन्ही संघांमध्ये एकमात्र कसोटी सामन्याला सुरूवात झाली आहे. कसोटी सामना म्हटलं तर, हा सामना पाच दिवस खेळवला जातो. पण इंग्लंड आणि झिम्बाब्वे या दोन्ही संघांमध्ये सुरू असलेला सामना चार दिवसांचा असणार आहे. मग हा सामना चार दिवसांचा का? काय आहे यामागचं कारण? जाणून घ्या.
इंग्लंड आणि झिम्बाब्वे संघांमध्ये रंगणार ४ दिवसीय कसोटी सामना
कसोटी क्रिकेटची सुरूवात १८७७ मध्ये झाली होती. त्यानंतर कसोटी क्रिकेटमध्ये तीन, चार किंवा सहा दिवसीय सामने खेळवले जायचे. २०१७ मध्ये दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे या दोन्ही संघांमध्ये चार दिवसीय सामना खेळवला गेला होता. त्याआधी १९७३ मध्ये न्यूझीलंड आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये ४ दिवसीय सामना खेळवला गेला होता. त्यानंतर ४४ वर्ष एकही चार दिवसीय कसोटी सामना खेळवला गेला नव्हता.
जास्तीत जास्त संघांनी कसोटी क्रिकेट खेळावं म्हणून आयसीसीने चार दिवसीय कसोटी सामना खेळण्यासाठी मान्यता दिली होती. २०१९ मध्ये इंग्लंड आणि आयर्लंड संघांमध्ये चार दिवसीय कसोटी सामन्याचा थरार रंगला होता.
चार दिवसीय कसोटी सामन्याचे नियम काय?
चार दिवसीय कसोटी सामन्याचे नियम वेगळे असतात. पाच दिवसीय कसोटी सामन्यात एका दिवसाला ९० षटकं फेकली जातात. पण चार दिवसीय कसोटी सामन्यात एका दिवसाला ९८ षटकं फेकली जातात. पाच दिवसांच्या कसोटी सामन्यात एकूण ४५० षटकं फेकली जातात. तर चार दिवसीय कसोटी सामन्यात ३९२ षटकं फेकली जातात. यासह फॉलोऑनचे नियमही वेगळे आहेत. पाच दिवसांच्या कसोटी सामन्यात २०० धावांवर फॉलोऑन लागू केला जातो. तर चार दिवसीय कसोटी सामन्यात १५० धावांच्या आघाडीवर फॉलोऑन लागू केला जातो.
पाच दिवसीय कसोटी सामन्यात एका दिवसाला ६ तासांचा खेळ होतो. ज्यात वेळ वाढवण्याचा पर्याय उपलब्ध असतो. तर चार दिवसीय कसोटी सामन्यातील एका दिवसात साडे सहा तासांचा खेळ होतो. ज्यात ३० मिनिटे वेळ वाढवून दिली जाऊ शकते.