स्टेडियममध्ये जाऊन आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना पाहणं अनेकांच्या खिशाला परवडत नाही. त्यामुळे बहुतेक क्रिकेटप्रेमी मोबाईल किंवा टीव्हीवर क्रिकेट सामने पाहणं पसंत करतात. पण आता थेट स्टेडियममध्ये जाऊन विनामूल्य क्रिकेट सामना पाहता येणार आहे. याबाबतची घोषणा मुंबई क्रिकेट असोसिएशन अर्थात एमसीएने केली आहे.
इंग्लंडचा महिला संघ भारत दौऱ्यावर आला आहे. उद्यापासून म्हणजेच ६ नोव्हेंबरपासून मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर इंग्लंड आणि भारताच्या महिला संघात तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. ६ डिसेंबर, ९ डिसेंबर आणि १० डिसेंबर रोजी वानखेडे स्टेडियमवर हे तिन्ही सामने खेळवले जाणार आहेत.
हे सर्व सामने क्रिकेट चाहत्यांना विनामूल्य पाहता येणार आहेत. प्रेक्षकांकडून कसल्याही पैशांची आकरणी केली जाणार नाही, याबाबतची घोषणा एमसीएने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून केली आहे. “सामन्यांच्या तारखा लक्षात ठेवा आणि या अद्भुत संधीचा फायदा घ्या” असं आवाहन एमसीएने केलं आहे. ऐरवी अशा आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी हजारो रुपयांचं तिकीट आकारलं जातं. पण भारत विरुद्ध इंग्लंडचे तिन्ही टी-२० सामने विनामूल्य पाहता येणार आहेत.