मँचेस्टर सिटीने शानदार कामगिरी करत स्वानसी सिटीचा ३-२ असा निसटता पराभव करत नवीन वर्षांच्या पहिल्याच दिवशी इंग्लिश प्रीमिअर लीगमध्ये अव्वल स्थानी झेप घेतली. मात्र त्यानंतर काही मिनिटांतच अर्सेनलने कार्डिफचा २-० असा पराभव करून मँचेस्टर सिटीकडून अव्वल स्थान हिरावून घेतले. त्यामुळे आता अर्सेनल, मँचेस्टर सिटी आणि चेल्सी या बलाढय़ संघांमध्ये जेतेपदासाठी चांगली चुरस पाहायला मिळणार आहे.
फर्नाडिन्होने १४व्या मिनिटाला पहिला गोल करत मँचेस्टर सिटीला आघाडी मिळवून दिली. मात्र पहिल्या सत्राच्या अखेरीस विल्फ्रेड बोनी याने स्वानसी सिटीला बरोबरी साधून दिली. याया टौरे (५८व्या मिनिटाला) आणि अलेक्झांडर कोलारोव्ह (६६व्या मिनिटाला) यांनी गोल करत मँचेस्टर सिटीला ३-१ असे आघाडीवर आणले. बोनीने ९०व्या मिनिटाला दुसरा गोल करून प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. पण तोपर्यंत स्वानसी सिटीचा पराभव जवळपास निश्चित झाला होता.
या विजयामुळे मँचेस्टर सिटीने ४४ गुणांसह या मोसमात पहिल्यांदा गुणतालिकेत अव्वल स्थानी मजल मारली. पण अर्सेनलने कार्डिफवर विजय मिळवून ४५ गुणांसह अव्वल स्थान कायम राखले. बलाढय़ अर्सेनल आणि कार्डिफ यांच्यातील सामना रंगतदार झाला. दोन्ही संघांनी अखेपर्यंत गोल करण्यासाठी प्रयत्न केले. पण सामना संपण्यासाठी काही मिनिटे शिल्लक असताना निकोलस बेंडट्नर (८८व्या मिनिटाला) आणि थिओ वॉल्कॉट (९०व्या मिनिटाला) यांनी गोल लगावत अर्सेनलला विजय मिळवून दिला.