फ्रँकफर्ट/स्टुटगार्ट : युरो अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेतील अ-गटात अखेरच्या साखळी सामन्यात अगदी शेवटच्या मिनिटापर्यंत चुरस पाहायला मिळाली. जर्मनी विरुद्ध स्वित्झर्लंड आणि हंगेरी विरुद्ध स्कॉटलंड या दोन्ही सामन्यांचे निकाल ९० मिनिटांनंतरच्या भरपाई वेळेतच लागले. राखीव खेळाडू निक्लस फुलक्रुगने ९२व्या मिनिटाला केलेल्या गोलमुळे जर्मनीने स्वित्झर्लंडला १-१ असे बरोबरीत रोखले. दुसरीकडे केव्हिन सोबोथने सामन्याच्या अगदी अखेरच्या किकवर १००व्या मिनिटाला गोल करून हंगेरीला स्कॉटलंडविरुद्ध १-० असा विजय मिळवून दिला.

जर्मनीने यापूर्वीच बाद फेरीतील स्थान निश्चित केले होते. मात्र, साखळी फेरीत अपराजित राहण्याचे त्यांचे ध्येय होते. त्यांचे हे ध्येय फुलक्रुगने अगदी मोक्याच्या वेळी अचूक हेडर मारून केलेल्या गोलमुळे साध्य झाले. याबरोबरीने जर्मनीने गटात अग्रस्थान मिळवले.

स्वित्झर्लंडचा आक्रमकपटू डॅन एन्डोयेने पूर्वार्धात २८ मिनिटाला स्वित्झर्लंडला अनपेक्षित आघाडी मिळवून दिली. यानंतर सामन्यात जर्मनीचे वर्चस्व राहिले. निर्विवादपणे त्यांनी आपल्या खेळाचा प्रभाव पाडला होता. गोलकक्षात सातत्याने धडक मारणाऱ्या जर्मनीला रोखण्यासाठी अनेकदा स्वित्झर्लंडच्या खेळाडूंनी धोकादायक प्रयत्न केले. प्रत्येक वेळेस जर्मनीने पेनल्टीसाठी अपील केले, पण इटालियन पंच डॅनिएल ओर्साटो यांनी अपील फेटाळून लावली. जर्मनीचा एक गोलही अपात्र ठरविण्यात आला. सामन्यात गोलजाळीच्या दिशेने तब्बल १८ फटके मारल्यानंतरही जर्मनीच्या पदरी फुलक्रुगच्या अचूक हेडरपर्यंत निराशाच पडली होती. डाव्या बाजूने आलेल्या क्रॉसवर स्वित्झर्लंडच्या दोन बचावपटूंनी घेरल्यानंतरही फुलक्रुगने सारी क्षमता पणाला लावून हेडरने चेंडूला गोलजाळीची दिशा दिली. त्यामुळे जर्मनीला बरोबरी साधता आली.

हेही वाचा >>> Copa America 2024: उरुग्वेचा पनामावर विजय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हंगेरीच्या आशा कायम

दुसरीकडे, सामन्याच्या तब्बल १००व्या मिनिटाला गोल करून हंगेरीने स्कॉटलंडचा १-० असा पराभव केला. या पराभवाने स्कॉटलंडचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले, तर हंगेरीच्या सर्वोत्तम तिसरा संघ म्हणून बाद फेरी गाठण्याच्या आशा कायम आहेत. हंगेरी सध्या गटात तिसऱ्या स्थानावर आहे. सर्व गटातून तिसऱ्या स्थानावरील सर्वोत्तम चार संघ निवडण्यात येणार आहेत. पूर्वार्धात चेंडूवर ६१ टक्के वेळ ताबा राखूनही स्कॉटलंडला गोलजाळीच्या दिशेने एकही किक मारता आली नाही. पहिल्या अर्ध्या तासाच्या खेळानंतर मात्र स्कॉटलंडचा खेळ खालावला. हंगेरीने आघाडीसाठी बरेच प्रयत्न केले. भरपाई वेळेच्या पहिल्याच मिनिटाला डॉमिनिक सोबोझ्लाईचा प्रयत्न स्कॉटलंडचा गोलरक्षक अॅन्गस गनने परतवून लावला. पुढच्याच मिनिटाला सोबोथची किक गोलपोस्टला धडकून बाहेर गेली. दोन्ही संघांकडून कमालीचा वेगवान खेळ झाला. स्कॉटलंडच्या मॅकटोमिनेने घसरत चेंडूला गोलजाळीची दिशा देण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू बाहेर गेला. अखेर ही बरोबरीची कोंडी १००व्या मिनिटाला फुटली.