राफेल बेनिटेझ यांची हकालपट्टी झाल्यानंतर रिअल माद्रिद क्लबच्या प्रशिक्षकपदी नियुक्त करण्यात आलेले दिग्गज फुटबॉलपटू झिनेदीन झिदान यांनी रिअलसाठी ‘जीव तोडून काम करणार’, अशी ग्वाही दिली. रिअल माद्रिदचे माजी दिग्गज आणि तीन वेळा जगातील सर्वोत्तम खेळाडूचा मान पटकावणाऱ्या झिदान यांची निवड ही क्लबमध्ये ऊर्जा निर्माण करणारी आहे.

‘‘आमचा क्लब जगातील सर्वोत्तम क्लब आहे. त्यामुळे आम्ही सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी कटिबद्ध आहोत आणि हंगामाच्या अखेरीस जेतेपद पटकावण्याचा आमचा प्रयत्न असेल. खेळाडू म्हणून या क्लबशी संलग्न झालो त्यापेक्षा अधिक आनंद आता होत आहे. ही जबाबदारी मी तन-मन लावून पार पाडेन,’’ असे झिदान यांनी सांगितले. माद्रिदचे अध्यक्ष फ्लोरेटिनो पेरेझ यांच्या कार्यकाळातील झिदान हे अकरावे प्रशिक्षक आहेत.