Ravindra Jadeja Test Ranking: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकत्याच जाहीर केलेल्या कसोटी क्रमावारीत भारताच्या रवींद्र जडेजाने अष्टपैलू खेळाडूंमध्ये आपले अव्वल स्थान कायम राखले आहे. २०२४ च्या आयसीसी कसोटी संघाचा भाग असलेला जडेजा गेल्या ११५२ दिवसांपासून कसोटी क्रिकेटमध्ये अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे.

नवी कसोटी क्रमवारी जाहीर झाल्यानंतर बीसीसीआयने रवींद्र जडेजाला कसोटी अष्टपैलू खेळाडूंमध्ये सर्वाधिक काळ अव्वल स्थानी विराजमान झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या होत्या. याचबरोबर अनेक क्रिकेट चाहत्यांनीही जडेजाचे या कामगिरीबद्दल कौतुक केले आहे. परंतु दुर्दैवाने कसोटी क्रिकेटमध्ये अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमावारीत सर्वाधिक दिवस अव्वल स्थानी राहण्याचा विक्रम जडेजाच्या नावावर नाही.

जॅक कॅलिस

आयसीसीच्या आकडेवारीनुसार, दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू खेळाडू जॅक कॅलिस हा सर्वाधिक दिवस अष्टपैलू कसोटी खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थानी राहिलेला खेळाडू आहे. कॅलिस १९ डिसेंबर २००६ ते १९ डिसेंबर २०११ पर्यंत अष्टपैलू कसोटी खेळाडूंच्या क्रमावारीत अव्वल स्थानावर होता, जो १,८२७ दिवसांचा कालावधी होता. याव्यतिरिक्त, १२ मार्च २००२ ते ३ मे २००५ दरम्यानही त्याने असाच विक्रम करत सलग १,१४९ दिवस अष्टपैलू कसोटी खेळाडूंच्या क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले होते.

जॅक कॅलिस हा दक्षिण आफ्रिकेचा मधल्या फळीतील फलंदाज आणि मध्यमगती गोलंदाज होता. त्याने १९९५ ते २०१३ या कालावधीत १६६ कसोटी सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ४५ शतकांसह १३२८९ धावा केल्या आहेत. याचबरोबर गोलंदाजीतही प्रभावी कामगिरी करत २९२ विकेट्स घेतल्या आहेत.

सर गारफिल्ड सोबर्स

१९८७ मध्ये कसोटी क्रिकेटच्या विकासानंतर आयसीसी क्रमवारी पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात आली हे देखील लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. परिणामी, त्या काळातील दिग्गज खेळाडूंना देखील अलीकडील ऐतिहासिक डेटा वापरून क्रमवारीत स्थान देण्यात आले. वेस्ट इंडिजचे महान खेळाडू सर गारफिल्ड सोबर्स यांनी २० फेब्रुवारी १९६२ ते १० मार्च १९७४ पर्यंत अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत वर्चस्व गाजवले होते. ते ४,४०२ दिवस अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर होते.

वेस्ट इंडिजचे महान खेळाडू सर गारफिल्ड सोबर्स यांनी १९५४ ते १९७४ या कालवधीत ९३ कसोटी सामन्यांमध्ये ८०७३ धावा केल्या आहेत. यामध्ये २६ शतके आणि ३० अर्धशतकांचा समावेश आहे. त्यांनी गोलंदाजीत २३५ विकेट्स घेतल्या आहेत.