वेगवान गोलंदाजीला पोषक इंदोरच्या होळकर मैदानावर समद फल्लाने बंगालच्या फलंदाजांना सळो की पळो करून सोडले. समदने ५८ धावांत घेतलेल्या ७ बळींमुळे महाराष्ट्राने बंगालचा पहिला डाव ११४ धावांतच गुंडाळला. महाराष्ट्राचा कर्णधार रोहित मोटवानीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि त्याचा हा निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरवला. बंगालच्या पहिल्या चार फलंदाजांना माघारी धाडत फल्लाने बंगालच्या फलंदाजीला खिंडार पाडले. सलामीवीर अरिंदम दासने १०८ चेंडूत ३७ धावांची चिवट खेळी केली.
हर्षद खडीवाले आणि चिराग खुराना यांनी महाराष्ट्राला ७८ धावांची सलामी दिली. यंदाच्या हंगामात जबरदस्त फॉर्मात असणाऱ्या हर्षद खडीवालेला त्रिफळाचीत करत लक्ष्मीरतन शुक्लाने बंगालला मोठे यश मिळवून दिले. त्याने २८ धावा केल्या. विजय झोल केवळ एक धाव करून तंबूत परतला. केदार जाधव अशोक दिंडाच्या गोलंदाजीवर खराब फटका खेळून बाद झाला. त्याने ८ चौकारांच्या साह्य़ाने ४० धावांची खेळी केली. अंकित बावणे आणि कर्णधार रोहित मोटवानी यांनी आणखी पडझड होऊ न देता डाव सावरला. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा महाराष्ट्राच्या ४ बाद १६४ धावा झाल्या आहेत. बावणे ३७ तर मोटवानी ८ धावांवर खेळत आहेत. महाराष्ट्राच्या संघाकडे ५० धावांची आघाडी आहे.
कर्नाटक-पंजाब लढतीत पावसाचा खेळ
मोहाली : पंजाब आणि कर्नाटक यांच्यातील रणजी उपांत्य फेरी सामन्याचा पहिला दिवस पावसाने गाजवला. सातत्यपूर्ण पावसामुळे  एकही चेंडू न टाकता खेळ रद्द करण्यात आला. पावसाचे पुन्हा आगमन झाले नाही तर रविवारी खेळाला लवकर सुरुवात करण्याचा पंचांचा विचार आहे.