ग्रँड स्लॅम जेतेपद हे प्रत्येक टेनिसपटूचे आयुष्यभराचे स्वप्न असते. मात्र हे स्वप्न प्रत्यक्षात साकारणे सगळ्यांना शक्य होत नाही. ज्यांनी हे स्वप्न जपले आहे अशा खेळाडूंनी ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत ‘एक पाऊल पुढे’ टाकत जेतेपदाच्या दिशेने वाटचाल केली.
यंदा ऑस्ट्रेलियन खुली टेनिस स्पर्धा सुरू झाल्यापासून उष्ण वातावरण हा मुद्दा चर्चेत होता, मात्र शनिवारी सूर्याने कृपा केल्यामुळे वातावरण थंडावले आणि खेळाडूंनी सुटकेचा नि:श्वास सोडला. प्रतिकूल वातावरणामुळे अनेक खेळाडूंना अशक्तपणा, पायात गोळे येणे, उलटी, चक्कर येणे अशा त्रासांना सामोरे जावे लागले होते. त्यांच्या कामगिरीवरही याचा परिणाम झाला.
१७ ग्रँड स्लॅम जेतेपदांचा अनुभव असलेल्या रॉजर फेडररने रशियाच्या तेयमुरेझ गाबाश्व्हलीचे आव्हान ६-२, ६-२, ६-३ असे सहज संपुष्टात आणत बहुप्रतीक्षित जेतेपदाच्या दिशेने आगेकूच केली. फेडररला गेल्यावर्षी एकाही ग्रँड स्लॅम जेतेपदावर कब्जा करता आलेला नाही. एटीपी दर्जाच्या स्पर्धाची केवळ दोन जेतेपदे त्याला पटकावता आली. खराब फॉर्मशी झगडणाऱ्या ३२ वर्षीय फेडररने निवृत्ती स्वीकारावी अशा चर्चाही सुरू झाल्या होत्या. मात्र मला अजूनही खेळायचे आहे, असे सांगत फेडररने सर्व चर्चाना पूर्णविराम दिला. प्राथमिक फेऱ्यांमध्ये अननुभवी खेळाडूंना सहज नमवणाऱ्या फेडररला पुढच्या काही सामन्यांमध्ये राफेल नदाल, अँडी मरे यासारख्या मातब्बर प्रतिस्पध्र्याचा सामना करायचा आहे.
इव्हान लेंडल यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या चौथ्या मानांकित अँडी मरेने स्पेनच्या फेलिसिआनो लोपेझवर ७-६ (७-२), ६-४, ६-२ अशी मात केली. मरेला ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेत तीनदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. लोपेझविरुद्धच्या आठही लढतींमध्ये मरेने निर्विवाद वर्चस्व राखले आहे. मरेची पुढची लढत फ्रान्सच्या स्टीफन रॉबर्टशी होणार आहे.
जबरदस्त फॉर्ममध्ये असणाऱ्या राफेल नदालने आणखी एक सहज विजय मिळवत जेतेपदासाठी आपण सज्ज असल्याचे दाखवून दिले. नदालने फ्रान्सच्या गेइल मॉनफिल्सचा ६-१, ६-२, ६-३ असा सहज पराभव करत पुढच्या फेरीत वाटचाल केली.
प्रदीर्घ कारकिर्दीत मारिया शारापोव्हाला कामगिरीत आणि यशामध्ये सातत्य राखता आले नाही. शनिवारच्या लढतीत याचा प्रत्यय आला. फ्रान्सच्या अलिझ कॉर्नेटवर विजय मिळवण्यासाठी शारापोव्हाला चांगलाच संघर्ष करावा लागला. तिसऱ्या मानांकित शारापोव्हाने ही लढत ६-१, ७-६ (८-६) अशी जिंकली. खांद्याच्या दुखापतीतून पुनरागमन करणाऱ्या शारापोव्हाच्या खेळात भरपूर चुका झाल्या. सव्र्हिस करताना, परतीचे फटके लगावताना तिचे अंदाज चुकल्याने कॉर्नेटने शारापोव्हाला अडचणीत टाकले, मात्र अंतिम क्षणांमध्ये खेळ उंचावत शारापोव्हाने निसटता विजय मिळवला.
जेतेपदासाठी सेरेनाला टक्कर देऊ शकणाऱ्या आणि गतविजेत्या व्हिक्टोरिया अझारेन्काने बिगरमानांकित युव्होन मेयुबर्गरचा ६-१, ६-० असा धुव्वा उडवत दिमाखदार विजयाची नोंद केली. उपांत्यपूर्व फेरीच्या प्रवेशासाठी अझारेन्काची स्लोअन स्टीफन्सशी लढत होणार आहे. या स्पर्धेचे सलग तिसरे जेतेपद पटकावण्यासाठी अझारेन्का आतुर आहे. पहिल्यावहिल्या ग्रँड स्लॅम जेतेपदाचे कॅरोलिन वोझ्नियाकीचे स्वप्न अधुरेच राहिले. स्पेनच्या गॅरबिन मुगुर्झाने वोझ्नियाकीला ४-७, ७-५, ६-३ असे नमवत खळबळजनक विजयाची नोंद केली.
सानिया, लिएण्डरची आगेकूच
ऑस्ट्रेलियन खुल्या स्पर्धेत शनिवारचा दिवस सानिया मिर्झा, रोहन बोपण्णा आणि लिएण्डर पेस या तिघांसाठी चांगला ठरला. या त्रिकुटाने आपापल्या साथीदारांसह खेळताना विजय मिळवत तिसरी फेरी गाठली. मात्र अनुभवी खेळाडू महेश भूपतीला पराभवाला सामोरे जावे लागले.
सानिया मिर्झाने झिम्बाब्वेच्या कॅरा ब्लॅकच्या साथीने खेळताना रोमानियाच्या मोनिका निकुलेस्यु आणि चेक प्रजासत्ताकच्या क्लॅरा झ्ॉकोपालोव्हा जोडीवर ७-५, ६-१ असा विजय मिळवला. त्यानंतर मिश्र दुहेरीच्या लढतीत रोमानियाच्या होरिआ टेकाऊच्या साथीने खेळताना या जोडीने तैपेईच्या हाओ चिंग चान आणि रॉबर्ट लिंडस्टेडट जोडीला ४-६, ७-६(३), १०-८ असे नमवले. पाचव्या मानांकित लिएण्डर पेस आणि राडेक स्टेपानेक जोडीने डॅनियल ब्रासिअली आणि अलेक्झांड्र डोलगोपोलव्ह जोडीवर ६-१, ६-४ अशी मात केली. या जोडीचा आता युकी भांबरी आणि न्यूझीलंडच्या मायकेल व्हिनसशी होणार आहे. पुरुष दुहेरीत सातव्या मानांकित रोहन बोपण्णाने पाकिस्तानच्या ऐसाम उल हक कुरेशीच्या बरोबरीने कॉलिन फ्लेमिंग आणि रॉस हचिसन्स जोडीचा ४-६, ६-३, ६-२ असा पराभव केला. मिश्र दुहेरीच्या लढतीत बोपण्णाने स्लोव्हाकियाच्या कटरिना स्त्रेबोटनिकवर ६-२, ६-३ असा विजय मिळवला. द्वितीय मानांकित अलेक्झांडर पेया आणि ब्रुनो सोरेस जोडीने महेश भूपती आणि अमेरिकेचा राजीव राम जोडीवर ६-४, ७-६ (७) असा विजय मिळवला.