नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटमधील गतविजेत्या गुजरात टायटन्स संघाने न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज लॉकी फग्र्युसन आणि अफगाणिस्तानचा यष्टीरक्षक-फलंदाज रहमनुल्ला गुरबाझ यांना आगामी हंगामापूर्वी कोलकाता नाइट रायडर्स संघाकडे पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
‘आयपीएल’च्या गेल्या खेळाडू लिलावात गुजरातने तेजतर्रार माऱ्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या फग्र्युसनला १० कोटी रुपयांत खरेदी केले होते. त्याने गेल्या हंगामातील १३ सामन्यांत १२ गडी बाद केले होते. गुजरातला ‘आयपीएल’ पदार्पणातच जेतेपद मिळवून देण्यात फग्र्युसनची महत्त्वाची भूमिका होती. मात्र, गुजरातने आता त्याला कोलकाताच्या संघात पाठवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे गुजरातला यंदाच्या खेळाडू लिलावात अन्य गोलंदाजावर मोठी बोली लावण्याचा पर्याय खुला झाला आहे. फग्र्युसनने यापूर्वी २०१७ ते २०२१ या कालावधीत कोलकाता संघाचे प्रतिनिधित्व केले होते.
दुसरीकडे, गेल्या हंगामापूर्वी इंग्लंडचा सलामीवीर जेसन रॉयला दुखापत झाल्यानंतर बदली खेळाडू म्हणून २० वर्षीय गुरबाझला गुजरातच्या संघात स्थान मिळाले होते. मात्र, त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. कोलकाताने गेल्या हंगामात सलामीवीरांचे बरेच पर्याय वापरून पाहिले, पण एकालाही फारसे यश मिळाले नाही. त्यामुळे आता युवा गुरबाझला कोलकाताकडून ‘आयपीएल’ पदार्पणाची संधी मिळू शकेल.