स्विस आणि अमेरिकेच्या पोलिसांनी फिफा अधिकाऱ्यांना भ्रष्टाचार आणि लाचखोरीच्या आरोपाखाली अटक केल्यानंतर या प्रकरणाला नवीन वळण मिळत आहे. २०१०चा विश्वचषक दक्षिण आफ्रिकेत होण्याकरिता फिफाला दक्षिण आफ्रिका संघटनेकडून १० दशलक्ष डॉलर दिल्याचा संशय अमेरिकन पोलिसांनी व्यक्त केला होता. मात्र प्रत्यक्षात ही रक्कम फिफाचे माजी उपाध्यक्ष जॅक वॉर्नर यांनी वैयक्तिक कामासाठी वापरल्याचे उघडकीस आले आहे. वॉर्नर यांनी रोख रक्कम काढून, क्रेडिट कार्डचे बिल भरून आणि वैयक्तिक कर्ज घेऊन या पैशांचा वापर केल्याचे पुरावे समोर आले आहेत.
२०१०चा विश्वचषक दक्षिण आफ्रिकेत होण्याकरिता १० दशलक्ष डॉलरची लाच दिल्याचा संशय व्यक्त केला होता. मात्र दक्षिण आफ्रिकेने या आरोपाचे खंडन केले आणि २००८ मध्ये ही रक्कम येथील फुटबॉल विकासासाठी दिल्याचा दावा केला होता. वॉर्नर यांनीही भ्रष्टाचाराच्या आरोपात तथ्य नसल्याचा दावा केला होता. मात्र बीबीसीच्या हाती लागलेल्या पुराव्यांमध्ये वॉर्नर यांनी फिफाला दिलेले १० दशलक्ष डॉलर उत्तर-मध्य अमेरिकन आणि कॅरेबियन फुटबॉल असोसिएशनच्या (सीओएनसीएसीएएफ) खात्यात वळविल्याचे समोर आले आहे. वॉर्नर त्यावेळी सीओएनसीएसीएएफचे अध्यक्ष होते. त्यानंतर वॉर्नर यांनी या रकमेचा वैयक्तिक कामासाठी वापर केला. त्रिनिदाद येथील जेटीए सुपरमार्केटमध्ये २००८ ते २००९ या कालावधीत टप्प्याटप्प्याने एकूण ४.८६ दशलक्ष डॉलरची खरेदी झाल्याचे पुरावे समोर आले आहेत. वॉर्नर यांच्याशी संबंधित असलेल्या व्यक्तींच्या नावे ३.६० दशलक्ष डॉलर बँकेतून काढल्याचे, तसेच १.६ दशलक्ष डॉलर वॉर्नर यांच्या क्रेडिट कार्डचे बिलासाठी आणि वैयक्तिक कर्जासाठी वापरल्याचे पुरावे हाती लागले आहेत. ‘‘वॉर्नर यांच्यावर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे. या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्यास ते बांधील आहेत,’’ असे मत त्रिनिदादचे क्रीडामंत्री आणि माजी आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू ब्रेंट सांचो यांनी व्यक्त केले आहे.

सेप ब्लाटर यांचा पाय खोलात
केपटाऊन :  फिफाचे माजी अध्यक्ष सेप ब्लाटर व दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष थाबो एमबेकी यांच्यात दहा लाख डॉलर्स रकमेबाबत ईमेलद्वारे पत्रव्यवहार झाले असल्याचे वृत्त येथील एका वृत्तपत्राने दिले आहे. या वृत्तामुळे ब्लाटर यांचे पाय आणखी खोलात जाणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.
दक्षिण आफ्रिकेला विश्वचषक स्पर्धेचे आयोजनपद मिळावे यासाठी ही रक्कम लाच म्हणून फिफाच्या पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. फिफाचे सरचिटणीस जेरोमी व्हाल्के यांनी दक्षिण आफ्रिकेच्या शासनास ही रक्कम केव्हा आमच्याकडे पाठविली जाईल अशी विचारणा केली असल्याचे या वृत्तात म्हटले आहे. अमेरिकन गुप्तहेर खात्याने दिलेल्या अहवालानुसार ही रक्कम फिफाचे पदाधिकारी जॅक वॉर्नर व अन्य दोन पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे समजते. या प्रकरणी वॉर्नर यांना अटकही करण्यात आली आहे.
याबाबत फिफा व दक्षिण आफ्रिका शासनाने केलेल्या खुलाशात असे म्हटले आहे, की ही रक्कम वॉर्नर यांच्या कॅरेबियन विकास प्रकल्पाकरिता देण्यात आली आहे. मात्र, एमबेकी यांनी कोणताही गैरव्यवहार झाला नसल्याचे म्हटले आहे.