आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाच्या (फिफा) त्रिसदस्य समितीने येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमची पाहणी करीत समाधान व्यक्त केले. २०१७मध्ये भारतात होणाऱ्या १७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेसाठी विविध स्टेडियम्सची पाहणी करण्यासाठी हे सदस्य कोचीमध्ये आले होते.
फिफाच्या स्पर्धा समितीचे उपसंचालक इनाकी अल्वारेझ यांच्यासह समितीने येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमची पाहणी केली. त्यांच्यासमवेत फिफाचे स्पर्धा व्यवस्थापक विजय पार्थसारथी, दक्षिण व मध्य आशिया विकास अधिकारी शाजी प्रभाकरन हेही उपस्थित होते. पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना अल्वारेझ म्हणाले, ‘‘आतापर्यंत आम्ही भारतामधील अनेक स्टेडियम्सची पाहणी केली आहे. सर्व ठिकाणचा उत्साह अतिशय कौतुकास्पद आहे. सर्व ठिकाणी फुटबॉलविषयी खूपच आवड दिसून आली आहे. भारतात ही स्पर्धा निश्चित यशस्वी होईल.’’