भुवनेश्वर : ‘फिफा’च्या वतीने घेण्यात येणाऱ्या कुमारी (१७ वर्षांखालील) विश्वचषक फुटबॉल स्पर्धेला मंगळवारपासून सुरुवात होणार असून यजमान भारतापुढे सलामीला बलाढय़ अमेरिकेचे आव्हान असेल. 

या स्पर्धेचे यजमानपद टिकविण्यासाठी भारताला बऱ्याच अडथळय़ांचा सामना करावा लागला. भारतीय संघाकडे अनपेक्षित आव्हान उभा करणारा संघ म्हणूनच बघितले जाईल; पण घरच्या मैदानावर खेळताना ते आपला खेळ उंचावू शकतात. भारतीय संघ यंदा कुमारी विश्वचषकात पदार्पण करणार असून मोरोक्को आणि टांझानिया हे अन्य दोन संघही प्रथमच या स्पर्धेत खेळतील. पहिल्या दिवशी भारत-अमेरिका सामन्यापूर्वी मोरोक्को आणि ब्राझील, तसेच चिली आणि न्यूझीलंड यांच्यात सामने होणार आहेत.

भारतीय संघाचे प्रशिक्षक थॉमस डेनेर्बी यांनी अमेरिकेचे आव्हान कठीण असल्याचे मान्य केले. घरच्या मैदानावर खेळताना भारतीय खेळाडू आपला खेळ उंचावतील. भारताविरुद्ध गोल करणे प्रतिस्पर्ध्याना निश्चित कठीण असेल. त्यामुळे अमेरिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात बरोबरी राखली, तरी भारतासाठी ती मोठी कामगिरी ठरेल.

अमेरिकेचा संघ विजयाने आपल्या मोहिमेस सुरुवात करण्यास उत्सुक असेल. या गटात ब्राझीलचाही समावेश असल्यामुळे पहिला सामना जिंकून आपला पुढील प्रवास सुकर करण्याचाच त्यांचा प्रयत्न असेल. अमेरिकेला संभाव्य विजेते म्हणून बघितले जात असले, तरी त्यांना पहिल्या सामन्यात भारताला कमी लेखता येणार नाही.

’ वेळ : रात्री ८ वा.

’ थेट प्रक्षेपण : स्पोर्टस १८-१