भुवनेश्वर : यजमान भारतीय संघाला शुक्रवारी कुमारी (१७ वर्षांखालील) विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या लढतीत मोरोक्कोकडून ०-३ असा पराभव पत्करावा लागला. अ-गटातील सलग दुसऱ्या पराभवामुळे भारताचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
शुक्रवारी झालेल्या अ-गटातील पहिल्या सामन्यात ब्राझील आणि अमेरिका यांच्यात १-१ अशी बरोबरी झाली. त्यामुळे भारत आणि मोरोक्कोचे संघ या स्पर्धेत आगेकूच करू शकणार नाहीत, हे स्पष्ट झाले.
मोरोक्कोविरुद्धच्या सामन्यातही भारतीय खेळाडूंना चेंडूवर ताबा मिळवण्यात फारसे यश आले नाही. मोरोक्कोच्या आघाडीपटूंना रोखणेही भारतीय मुलींना जमले नाही. पूर्वार्धात या सामन्यात गोलशून्य बरोबरी होती. उत्तरार्धात ५१व्या मिनिटाला दोहा मदानीने पेनल्टीवर गोल करून मोरोक्कोचे खाते उघडले. त्यानंतर यास्मिन झौहीरने ६२व्या, तर डेन्नाह शेरीफने भरपाई वेळेतील पहिल्या मिनिटाला गोल करून मोरोक्कोच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. मोरोक्कोच्या खेळाडूंनी गोलच्या दिशेने १० फटके मारले, तर भारतीय मुलींना केवळ एकदाच गोलवर फटका मारता आला. भारताचा अखेरचा साखळी सामना ब्राझीलविरुद्ध होणार आहे.