फिफाच्या शिष्टमंडळाचा पाहणी
पुढील वर्षी भारतात होणाऱ्या १७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक स्पध्रेचे सामने नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर खेळविण्यात येण्याची शक्यता अधिक बळावल्या आहेत. आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाच्या (फिफा) शिष्टमंडळाने मंगळवारी या स्टेडियमची पाहणी केली आणि अमेरिका व युरोपियन देशांमधील स्टेडियमशी त्याची तुलना केली.
‘‘डी. वाय. पाटील स्टेडियम अप्रतिम आहे. येथील सुविधा उच्च दर्जाच्या आहेत. माझ्या एका सहकाऱ्याने सांगितले की काही सुधारणा केल्यास येथे विश्वचषक दर्जाच्या स्पर्धा खेळवण्यात येऊ शकतील. स्टेडियमची पाहणी केल्यानंतर आम्ही समाधानी आहोत,’’ अशी प्रतिक्रिया फिफाचे जैम यार्झा यांनी दिली. २०१७ साली होणाऱ्या या स्पध्रेकरिता सहा शहरांची निवड करण्यात आली आहे. त्या शहरांमधील स्टेडियमची पाहणी करण्यासाठी हे शिष्टमंडळ भारत दौऱ्यावर आहे. कोची आणि गोवा येथील स्टेडियमची पाहणी केल्यानंतर यार्झा यांच्या नेतृत्वाखालील हे शिष्टमंडळ नवी दिल्ली, कोलकाता आणि गुवाहाटी येथे जाणार आहे.
‘‘डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये आणखी काही मूलभूत सुधारणांची गरज आहे. ड्रेसिंग रूम, तांत्रिक विभाग आणि वैद्यकीय विभागासह काही ठिकाणी नूतनीकरणाची आवश्यकता आहे. तशा सूचना स्टेडियमच्या मालकांना सुचविल्या आहेत आणि त्यांनी ते मान्यही केल्या आहेत. किरकोळ बदल सोडल्यास ९५ टक्के काम पूर्ण झालेले आहे. त्यावर आम्ही समाधानी आहोत. या स्टेडियमची तुलना अमेरिका आणि युरोप किंवा आशियातील स्टेडियमशी करू शकतो,’’ असे यार्झानी सांगितले.
ऑक्टोबर महिन्यात या स्टेडियमची पुन्हा पाहणी करण्यात येणार आहे. फिफाच्या शिष्टमंडळाने इंडियन सुपर लीग स्पध्रेदरम्यान येथे हजेरी लावली होती. त्यामुळे या स्टेडियमची सखोल माहिती त्यांना आहे. स्टेडियमचे मालक विजय पाटील म्हणाले की, ‘‘हा ऐतिहासिक क्षण आहे. फिफा अधिकाऱ्यांनी आमच्या स्टेडियमची पाहणी केली, हा आमचा सन्मान आहे. आम्ही आमच्याकडून सर्वोत्तम काम करण्याचा प्रयत्न करू.’’