फिफा विश्वचषकातील ब्राझीलविरुद्धचा सामना जर्मनी इतक्या सहजतेने खिशात टाकेल, याचा अंदाज सट्टेबाजांनाही आला नाही. मात्र या सामन्यात काहीही होऊ शकते, असा सट्टेबाजांचा सुरुवातीपासूनच होरा होता. हा सामना सुरू झाला, तेव्हाही दोन्ही संघांना (९० पैसे) समान भाव होता. मात्र जर्मनीने गोलचा सपाटा लावल्यानंतर ब्राझीलचा भाव तीन ते पाच रुपयांवर पोहोचला. जर्मनीचा भाव शेवटी १० पैशांवर आला. आता अर्थात विश्वचषक विजेते म्हणून जर्मनीलाच सट्टेबाजांनी पसंती दिली आहे. जर्मनीला १५ पैसे भाव देण्यात आला आहे. गोल करणाऱ्यांच्या यादीत थॉमस म्युलरचा भाव वधारला आहे. परंतु कोलंबियाचा जेम्स रॉड्रिगेझ सर्वाधिक गोलकर्ता म्हणून कायम राहील, असाच सट्टेबाजांचा होरा आहे.
आजचा भाव :
सट्टेबाजांचा विश्वविजेत्याचा क्रम असा असेल :
जर्मनी : ३५ पैसे (८/११)
अर्जेटिना : ९० पैसे (१३/५)
नेदरलँड्स : दोन रुपये (४/१)
बाळाचे हात पायावर दिसतात!

‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात’ या म्हणीला जागतच व्यक्तीच्या मोठेपणाची लक्षणे बालपणीच दिसतात. परंतु अर्जेटिनाचा आघाडीचा फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या बाबतीत ‘बाळाचे हात पायावर दिसतात’ असे आता म्हटले जात आहे. मेस्सीने आपला दीड वर्षांचा मुलगा थिआगो याच्यावरील प्रेमाखातर त्याचे इवलेसे हात आणि नाव ‘टॅटू’द्वारे आपल्या डाव्या पायावर गोंदवून घेतले आहेत.

कोलकातावासीयांवरही शोककळा!
कोलकाता म्हणजे भारतातील फुटबॉलची पंढरी. ब्राझीलप्रमाणेच फुटबॉलची आवड जोपासणाऱ्या या शहरात ब्राझीलचे चाहते खोऱ्याने सापडतील. त्याचबरोबर अनेक ब्राझिलियन फुटबॉलपटू कोलकातामधील अनेक क्लब्जमधून खेळताना दिसतील. मंगळवारी ब्राझील आणि जर्मनी यांच्यातील उपांत्य फेरीच्या सामन्याआधी कोलकातामधील ब्राझीलच्या पाठीराख्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. कोलकातामधील रस्त्यारस्त्यांवर ब्राझीलची पिवळी आणि हिरव्या रंगाची जर्सी घातलेले चाहते मोठय़ा संख्येने दिसत होते. पण ब्राझीलचा संघ जर्मनीकडून १-७ असा मोठय़ा फरकाने पराभूत झाला आणि कोलकातामधील दुकानांमध्ये, मॉल्समध्ये लागलेले ब्राझीलचे झेंडे बुधवारी सकाळी खाली उतरले होते. जणू ब्राझीलच्या पराभवामुळे कोलकातावरच शोककळा पसरली, असे चित्र बुधवारी सकाळी पाहायला मिळत होते. कोलकातातील क्लब्जमधून खेळणारे अनेक ब्राझिलियन खेळाडू या मानहानीकारक पराभवामुळे मायदेशातील मित्र-मैत्रिणी, नातेवाइकांचे फोन घेऊन वैतागले होते. ‘‘हा पराभव आम्हाला किती जिव्हारी लागला आहे, हे शब्दांत सांगणे कठीण आहे. या पराभवातून सावरायला आम्हाला काही वेळ लागणार आहे,’’ असे एडवान कार्वाल्हो म्हणाला.