विश्वचषकासाठी ब्राझीलला निघण्यापूर्वी जपानकडून फार मोठय़ा अपेक्षा होत्या, पण एका सामन्यात पराभव आणि एक सामना बरोबरीत सोडवल्यामुळे जपानला कोलंबियाविरुद्धचा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागणार आहे. पण कोलंबियाचे आव्हान नक्कीच त्यांच्यापुढे सोपे नसेल. कारण ‘क’ गटामध्ये दोन विजयांसह कोलंबियाचा संघ अव्वल स्थानावर असून त्यांनी बाद फेरीत स्थान मिळवले आहे.
जपानला आयव्हरी कोस्टकडून १-२ असा पराभव स्वीकारावा लागला होता, तर त्यांनी ग्रीसबरोबरचा सामना बरोबरीत सोडवला होता. गटामध्ये जपान एका गुणानिशी तिसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे त्यांनी हा सामना जिंकून आयव्हरी कोस्ट ग्रीसकडून पराभूत झाल्यास त्यांना बाद फेरीत पोहोचला येऊ शकेल. दुसरीकडे कोलंबियाच्या संघापुढे गटामध्ये अपराजित राहण्याचे आव्हान असेल. दोन्ही संघांचा विचार करता कोलंबियाचे पारडे जपानपेक्षा जड वाटत आहे. त्यामुळे जपानसाठी कोलंबियाचा पेपर नक्कीच कठीण असेल.
सामना क्र. ३७ :
‘क’ गट : कोलंबिया वि. जपान
स्थळ :  एरिना पॅन्टानल, कुईबा
वेळ :  मध्यरात्री १.३० वा. पासून