FIFA World Cup 2018 : सध्या सर्वत्र फिफा विश्वाचषक आणि फुटबॉलची क्रेझ आहे. शनिवारपासून या स्पर्धेत बाद फेरीचे सामने रंगणार असून १६ बलाढ्य संघ पुढील फेरीत जाण्यासाठी आपसात भिडणार आहेत. फुटबॉल विश्वचषकाच्या निमित्ताने जगभरात लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वत्र फुटबॉलच्या चर्चांना उधाण आले आहे. इतकेच नव्हे, तर गल्लीबोळात क्रिकेट खेळणारी मुले आत फुटबॉल खेळताना दिसत आहेत. या फुटबॉलच्या ‘फिव्हर’मधून भारतीय क्रिकेटपटूदेखील सुटू शकलेले नाहीत.
सध्या भारतीय संघ आयर्लंड येथे टी२० मालिका खेळत आहे. यातील पहिल्या टी२० सामन्यात भारताने आयर्लंडच्या संघाला मोठ्या फरकाने पराभूत केले होते. त्यामुळे २ सामन्यांच्या मालिकेत भारताला आघाडी मिळाली होती. त्यामुळे काहीसे रिलॅक्स असलेल्या भारतीय संघाने गुरुवारी चक्क फुटबॉलचा सामना खेळला. कोहली विरुद्ध धोनी अशा दोन कर्णधारांच्या नेतृत्वाखाली या सामना रंगला. या सामन्यात कोहलीच्या संघाने धोनीच्या संघावर ४-२ अशी मात केली. सर्व खेळाडूंनी फुटबॉल खेळण्याचा मनसोक्त आनंद लुटला. आणि यष्टीरक्षक दिनेश कार्तिक हा कोहली संघाच्या विजयाचा मानकरी ठरला. त्याला सामनावीर घोषित करण्यात आले.