फिफा विश्वचषक २०२२ मध्ये, ब्राझीलने त्यांच्या पहिल्या सामन्यात सर्बियाचा २-० ने पराभव केला. मात्र या सामन्यात ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू नेमार जखमी झाला. आता त्याच्या दुखापतीचे मोठे अपडेट समोर येत आहे. वास्तविक, ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू त्याच्या दुखापतीतून झपाट्याने सावरत आहे. उजव्या पायाच्या घोट्याला झालेल्या दुखापतीमुळे त्याला स्वित्झर्लंडविरुद्धच्या सामन्याला मुकावे लागणार आहे. पण या दुखापतीतून तो झपाट्याने सावरतो आहे.

संघातील सहकारी मार्क्विनहोसच्या म्हणण्यानुसार, “नेमार २४ तास फिजिओथेरपी घेत असून आमच्या निगराणी खाली त्याच्यावर उपचार सुरु आहेत आणि महत्वाची बाब म्हणजे तो घोट्याच्या दुखापतीतून बरा होत आहे. ब्राझीलच्या संघाकडून आलेल्या माहितीनुसार असे सांगितले जात आहे की, “तो सोमवारी स्वित्झर्लंडविरुद्धचा दुसरा सामना खेळू शकणार नाही. बहुधा तसेच २ डिसेंबर रोजी कॅमेरून विरुद्ध ब्राझील यांच्यातील साखळी फेरीतील तिसरा आणि अंतिम सामना जर लवकर दुखापतीतून सावरला नाही तर त्या सामन्याला देखील तो मुकेल.” ईएसपीएन सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही अपडेट समोर येत आहे.

नेमारची दुखापत आणि राईट बॅक डॅनिलोच्या आजारपण या दुहेरी झटक्यामुळे ब्राझील स्पर्धेतून बाहेर पडेल अशी चिंता संघाला सतावत होती, परंतु टिटेने रविवारी सांगितले की, “स्पर्धेत कधीतरी दोन्ही खेळाडू लवकरच उपलब्ध होतील अशी संघाला अपेक्षा आहे. ब्राझीलचे प्रशिक्षक टीटे पुढे बोलताना म्हणाले की. “मला विश्वास आहे की नेमार आणि डॅनिलो विश्वचषक खेळतील. माझा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. वैद्यकीय उपचार आणि वैद्यकीयदृष्ट्या असणाऱ्या तांत्रिक बाबींच्या उपचारांमधील टप्प्यांबद्दल मी अधिक बोलू शकत नाही. परंतु मला त्याच्यातील बरे होण्यासाठीचा आत्मविश्वास जाणवतो आहे. मला अशा आहे की आम्ही त्या दोघांसोवत हा विश्वचषक खेळू. ते दोन्ही ज्यावेळी संघात परतील त्यावेळी आमचा संघ अधिक सक्षम होईल.” पत्रकार परिषदेत टिटे म्हणाले.

निकोला मिलेंकोविचच्या जोरदार टॅकलनंतर खेळाच्या सुरुवातीला दुखापत झाली असली तरी २-० च्या विजयाच्या ८०व्या मिनिटाला नेमारला बदलण्यात आले होते. टाइटने नेमारची जागा लवकर न घेतल्याबद्दल चूक मान्य केली आणि दावा केला की फॉरवर्डला दुखापत झाली आहे हे मला माहीत नव्हते. “तो जखमी झाला होता, ती जखम किती गंभीर आहे याचा मला अंदाज आला नाही, त्यावेळी नक्की काय झाले हे कोणाच्याच लक्षात आले नाही आणि मलाही फारसे त्यावेळी कळले नाही. तोपर्यंत नेमार तसाच मैदानात खाली बसला होता. पण त्यानंतर तो थोडा पुन्हा लंगडत खेळू लागला आणि त्याने गोल ही केला. मात्र त्याची घोट्याची दुखापत अधिक वाढली आणि तो तिथेच कोसळला.” असा संपूर्ण घटनाक्रम टिटेने नमूद केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेमारने त्याच्या दुखापतीबद्दल एक मोठा अपडेट दिला

ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू नेमारने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून त्याच्या दुखापतीबाबत अपडेट देताना एक खास पोस्ट शेअर केली आहे. त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “ब्राझिलियन शर्ट घालून मला जो अभिमान आणि प्रेम वाटते ते शब्दात व्यक्त करता येणार नाही. जर देवाने मला जन्माला येण्यासाठी एखादा देश निवडण्याची संधी दिली तर तो ब्राझील असेल. माझ्या आयुष्यात काहीही सोपे नव्हते, मला नेहमी माझ्या स्वप्नांचा आणि ध्येयांचा पाठलाग करावा लागला.”

नेमारच्या दुखापतीवर मार्क्विनहोस म्हणाला,”त्याच्या घोट्याच्या सर्व प्रकारच्या टेस्ट झाल्या आहेत तो २४ तास फ़िजिओथेरपीचे उपचार घेत असून तो सध्या त्याच्या हॉटेलमध्ये विश्रांती घेत आहे आणि आम्हा सर्वांना आशा आहे की तो फिफा विश्वचषकातील उर्वरित सामन्यात लवकरच पुनरागमन करेन.”