फिफा विश्वचषक २०२२ फुटबॉल स्पर्धेला कतारमध्ये सुरूवात झाली आहे. रविवारी (२० नोव्हेंबर) कतार आणि इक्वेडोर यांच्यात शानदार उद्घाटन सोहळ्यात स्पर्धा झाली, ज्यामध्ये यजमान कतारचा पराभव झाला. फुटबॉल सामन्यांव्यतिरिक्त विश्वचषक वेगवेगळ्या बाबींमुळे चर्चेत येत आहे. पहिल्याच दिवशी इथे वाद झाला, त्यात भारतीय केंद्रस्थानी होते.
डेलीमेलच्या वृत्तानुसार, ज्या अल-बैत स्टेडियममध्ये उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला होता. तेथे कतार स्टार सर्व्हिस नावाच्या कंपनीने २०० हून अधिक भारतीयांना केटरिंग सेवेसाठी नियुक्त केले होते. यातील काही लोक कॅशियर होते, तर काहींना सेवा देण्यासाठी मैदानाच्या आत ठेवण्यात आले होते.
मात्र, विश्वचषकाच्या पहिल्याच दिवशी त्यांच्याशी गैरवर्तन करण्यात आले आणि त्यांना स्टेडियमबाहेर तासनतास थांबवण्यात आले. वृत्तानुसार, २०५ पुरुष-७ महिलांच्या संपूर्ण टीमला सकाळी ९ वाजता त्यांच्या हॉटेलमधून घेऊन सकाळी १० वाजता दोहा येथील स्टेडियमजवळ सोडण्यात आले. मात्र या सर्वांना दुपारी चार वाजेपर्यंत प्रवेश देण्यात आला नव्हता.
भारतीय केटरर्सने सांगितले की, यावेळी त्यांना स्टेडियमच्या बाहेर थांबावे लागले, येथे ना पाणी दिले गेले ना अन्न. पर्यवेक्षकाशीही संपर्क झाला नाही आणि तो येईपर्यंत हा प्रकार करण्यात आला. सर्व केटरर्सना सांगण्यात आले होते की रोज एक वेळ जेवण दिले जाईल.
केवळ भारतीय केटरर्सच नाही तर फिलिपाइन्समधील २० महिला कर्मचाऱ्यांसोबतही असेच घडले. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना स्टेडियमच्या आत वस्तू विकण्यासाठी आणण्यात आले होते. परंतु त्यांना सुमारे चार तास स्टेडियमच्या बाहेर थांबावे लागले आणि कोणालाही प्रवेश दिला गेला नाही.
