फिफा विश्वचषक २०२२ च्या क गटात अर्जेंटिनाचा सामना सौदी अरेबियाशी झाला. या सामन्यात सौदी अरेबियाने आपल्या खेळाने अर्जेंटिनाला चकित करत २-१ ने पराभूत केले. कर्णधार मेस्सीने अर्जेंटिनासाठी निश्चितपणे गोल केला, पण नंतर तो आपल्या संघासाठी एकही गोल करू शकला नाही. तेवढा गोल संघासाठी पुरेसा पडू शकला नाही. या सामन्यात अर्जेंटिनाचा खेळ अगदीच सरासरी होता, तर सौदी अरेबियाने त्यांच्यापेक्षा सरस खेळ दाखवत या विश्वचषकात विजयासह पदार्पण केले.
१९७८ व १९८६ असा दोन वेळच्या विश्वचषक विजेत्या अर्जेंटिनावर त्यांनी ०-१ पिछाडीवरून विजय २-१ असा मिळवला. कतारमध्ये आयोजित केलेल्या या स्पर्धेच्या पहिल्या दोन दिवसांत यजमान कतारसह इराणला देखील हार मानावी लागली होती. त्यामुळे आशियाई संघांकडून फारशी कोणी अपेक्षा ठेवत नव्हते त्यात सौदी अरेबियाचाही समावेश होता, परंतु त्यांनी चमत्कार केला आणि लिओनेल मेस्सीच्या संघाला पराभवाचा धक्का दिला. सौदी अरेबियाच्या बचावाला आज तोड नव्हती त्यांनी अर्जेंटिनाला काही केल्या बरोबरीचा गोल करण्याची संधीच दिली नाही.
मेस्सीने आपल्या संघासाठी पहिला गोल केला
या विश्वचषकात अर्जेंटिनासाठी पहिला गोल तसेच या सामन्यातील पहिला गोल संघाचा कर्णधार मेस्सीने केला. १०व्या मिनिटाला मेस्सीला पेनल्टी मिळाली आणि त्याने त्याचे सहज रुपांतर केले. या गोलमुळे अर्जेंटिनाने पहिल्या दहा मिनिटांत आपला स्कोअर १-० असा केला. यानंतर अर्जेंटिनाच्या संघाला पूर्वार्धात एकही गोल करता आला नाही, तर सौदी अरेबियालाही गोल करण्यात अपयश आले. पहिल्या हाफअखेर अर्जेंटिनाचा संघ १-० ने आघाडीवर होता. मेस्सीने हा गोल करत नवा विक्रम प्रस्थापित केला. चार विश्वचषक स्पर्धेत ( २००६, २०१४, २०१८ व २०२२) अर्जेंटिनाकडून गोल करणारा लिओनेल मेस्सी हा पहिला खेळाडू, तर जगभरातील पाचवा खेळाडू ठरला. यापूर्वी पेले, उवे सीलर, मिरोस्लाव्ह क्लोस व ख्रिस्तियानो रोनाल्डो यांनी अशी कामगिरी केली आहे.
सौदी अरेबियाने उत्तरार्धात शानदार पुनरागमन केले
उत्तरार्धात सौदी अरेबियाच्या संघाने शानदार पुनरागमन केले आणि खेळाच्या ४८व्या मिनिटाला सालेह एलशेहरीने आपल्या संघासाठी पहिला गोल करून स्कोअर १-१ असा केला. यानंतर सालेमने ५३व्या मिनिटाला दुसरा गोल करत सौदी अरेबियाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. या सामन्यात ९० मिनिटांचा खेळ संपेपर्यंत सौदी अरेबियाने २-१ अशी आघाडी कायम ठेवली होती. यानंतर दोन्ही संघांना १४ मिनिटांचा अतिरिक्त वेळ देण्यात आला. या अतिरिक्त वेळेत अर्जेंटिनाने गोल करण्याचा प्रयत्न केला, मात्र सौदीचा बचाव भेदण्यात त्यांना यश आले नाही.
३६ सामन्यांमध्ये अपराजित राहिल्यानंतर अर्जेंटिनाचा हा पहिला पराभव आहे
तारांकित खेळाडू लिओनेल मेस्सी नेतृत्व करत असलेल्या अर्जेटिनाच्या संघाने विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या सराव सामन्यामध्ये दमदार कामगिरी केली होती. आठवडाभरापूर्वी झालेल्या अंतिम सराव सामन्यात संयुक्त अरब अमिरातीवर मेस्सीच्या संघाने ५-० असा विजय मिळवला होता. विश्वचषकाच्या जेतेपदासाठी प्रबळ दावेदार असलेला अर्जेटिनाचा संघ आजच्या सौदी अरेबियाच्या सामन्यापूर्वी खेळवण्यात आलेल्या ३६ सामन्यांत अपराजित राहिला होता.