लंडन : कर्णधार लिओनेल मेसी आणि आघाडीपटू लौटारो मार्टिनेझ यांच्या अप्रतिम कामगिरीच्या जोरावर अर्जेटिना फुटबॉल संघाने इटलीवर ३-० अशी मात करत पहिल्या फिनालिसिमा चषकाचे विजेतेपद पटकावले. कोपा अमेरिका स्पर्धेचे विजेते आणि युरो चषकाचे विजेते यांच्यात यंदा पहिल्यांदाच फिनालिसिमा चषकासाठी सामना खेळवण्यात आला. वेम्बली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात २८व्या मिनिटाला मेसीच्या पासवर मार्टिनेझने गोल करत अर्जेटिनाला आघाडी मिळवून दिली. मग मार्टिनेझच्या साहाय्याने अँजेल डीमारियाने गोल झळकावल्याने मध्यंतराला अर्जेटिनाकडे २-० अशी आघाडी होती. उत्तरार्धात मेसीच्या पासवर पाव्लो डिबालाने गोल केल्यामुळे अर्जेटिनाने हा सामना ३-० अशा फरकाने जिंकला.