जयपूर : भारतीय क्रिकेटमध्ये बुधवारपासून रोहित शर्मा आणि राहुल द्रविड या नव्या कर्णधार-प्रशिक्षक जोडीच्या पर्वाला प्रारंभ होईल. ट्वेन्टी-२० विश्वचषकातील अपयश मागे सारून जयपूर येथे न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात वर्चस्व गाजवण्याच्या निर्धाराने भारताचे खेळाडू मैदानात उतरतील.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळताना भारताला यंदा विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठण्यात अपयश आले. कोहलीने स्पर्धेपूर्वीच ट्वेन्टी-२० संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यातच रवी शास्त्री यांचाही मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपुष्टात आला. अशा स्थितीत पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषकासाठी नव्याने संघबांधणी करण्याची भारताला संधी आहे. त्यामुळे ‘आयपीएल’मध्ये आपल्या कल्पक नेतृत्वाने मुंबई इंडियन्सला पाच वेळा जेतेपदाचा किताब मिळवून देणारा रोहित आणि युवा खेळाडूंना पैलू पाडण्यात पटाईत असलेला द्रविड यांची जोडी भारतासाठीही मोलाचे योगदान देईल, अशी तमाम चाहत्यांना अपेक्षा आहे.

दरम्यान, जयपूरच्या सभोवताली असणाऱ्या शहरांत सध्या प्रदूषणात वाढ झाली असून पहिल्या लढतीवरही याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र या बाबीकडे दुर्लक्ष करून भारत विश्वचषकातील पराभवाचा वचपा काढणार का, हे पाहणे रंजक ठरेल.

विल्यम्सनची माघार; साऊदीकडे नेतृत्व

न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सनने कसोटी मालिकेपूर्वी पुरेशी विश्रांती मिळावी, या हेतूने ट्वेन्टी-२० मालिकेत न खेळण्याचे ठरवले आहे. त्यामुळे वेगवान गोलंदाज टिम साऊदी न्यूझीलंडचे नेतृत्व करणार आहे. डेवॉन कॉन्वेसुद्धा दुखापतीमुळे मुकणार असल्याने डॅरेल मिचेल, मार्टिन गप्टिल यांच्यावर फलंदाजीची भिस्त असेल. लॉकी फग्र्युसनचे पुनरागमन झाल्यामुळे न्यूझीलंडच्या गोलंदाजीची ताकद वाढली आहे.

युवा फळीकडे लक्ष

कोहली, शिखर धवन यांसारख्या प्रमुख फलंदाजांच्या अनुपस्थितीत ऋतुराज गायकवाड, इशान किशन, श्रेयस अय्यर या युवा फळीच्या कामगिरीकडे सर्वाचे लक्ष असेल. रोहितच्या साथीने महाराष्ट्राचा ऋतुराज सलामीला येण्याची शक्यता असून मुंबईकर सूर्यकुमार यादवचे मधल्या फळीतील स्थान पक्के मानले जात आहे.

हार्दिकच्या पर्यायाचा शोध

अष्टपैलू हार्दिक पंडय़ाला सुमार कामगिरीमुळे या मालिकेतून वगळण्यात आल्यामुळे त्याच्याऐवजी वेंकटेश अय्यरला छाप पाडण्याची संधी आहे. भुवनेश्वर कुमार भारताच्या गोलंदाजी विभागाचे नेतृत्व करेल. रविचंद्रन अश्विन फिरकीची धुरा वाहील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वेळ : सायंकाळी ७ वा. थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी (संबंधित एचडी वाहिन्यांवर)