शतकातील सर्वात जास्त बक्षीस रक्कम असलेल्या लढतीत मॅन्नी पकिआओवर विजय साजरा करून सलग ४८ सामन्यांत अपराजित राहणाऱ्या अमेरिकेच्या बॉक्सिंगपटू फ्लॉइड मेवेदरने १२ सप्टेंबरमध्ये होणाऱ्या लढतीसाठी अँड्रे बेटरेला अव्हान दिले आहे. ही लढत जिंकून अमेरिकेचा दिग्गज बॉक्सिंगपटू रॉकी मार्सिआनोच्या ४९ विजयाच्या विक्रमाशी बरोबरी करण्याचा त्याचा मानस आहे. मे महिन्यात झालेल्या पकिआओविरुद्धच्या लढतीनंतर सप्टेंबरमध्ये आपण अखेरचा सामना खेळणार असल्याची घोषणा मेवेदरने केली होती. त्यानंतर या सामन्यासाठी तो कोणाला आव्हान देईल, याकडे सर्वाचे लक्ष लागले होते. याच दरम्यान कट्टर प्रतिस्पर्धी अमीर खानने मेवेदरला आव्हान दिले, परंतु त्याने ते धुडकावले. बुधवारी मेवेदरने अमेरिकेच्या बेर्टोविरुद्ध खेळणार असल्याची घोषणा केली. जागतिक बॉक्सिंग असोसिएशन (डब्लूबीए) आणि जागतिक बॉक्सिंग काउंसिलचे (डब्लूबीसी) जेतेपद पटकावणाऱ्या मेवेदरने दोन वेळा विश्वविजेता ठरलेल्या बेटरेला आव्हान देऊन वेल्टरवेटसमोर खडतर आव्हान उभे केले आहे. १२ सप्टेंबरला पुन्हा रिंगमध्ये उतरण्यासाठी मी सज्ज आहे. मी सर्वोत्तम बॉक्सिंगपटू आहे, हे जगासमोर पुन्हा एकदा मी सिद्ध करणार आहे. मी नेहमी अव्वल दर्जाचा खेळ करणे पसंत केले आणि बेटरेविरुद्धची लढतही त्याला अपवाद ठरणार नाही. तो युवा खेळाडू असून तगडा प्रतिस्पर्धी आहे आणि विशेष म्हणजे विजयासाठी भुकेला आहे. - फ्लॉइड मेवेदर फ्लॉइडला नमवण्यासाठी मी सज्ज आहे. ४८ सामन्यांत त्याच्या प्रतिस्पर्धी खेळाडूंना विजय मिळवण्यात अपयश आले, याची चिंता अजिबात नाही. कोणी तरी त्याला नमवेल आणि तो कोणी मीही असू शकतो. अँड्रे बेटरे