मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदी दिल्लीचा माजी रणजीपटू आणि कर्णधार मिथुन मन्हासची वर्णी लागण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याचा अनुभव नसलेल्या मन्हासने रविवारी ‘बीसीसीआय’च्या मुंबईतील मुख्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

अध्यक्षपदासाठी अनेक मोठी नावे चर्चेत असताना अचानक मन्हास याची उमेदवारी आश्चर्यकारक मानली जात आहे. मन्हासने १९९७ ते २०१७ या आपल्या दोन दशकांच्या कारकीर्दीत १५७ प्रथमश्रेणी, १३० देशांतर्गत एकदिवसीय (लिस्ट ए) आणि ५५ ‘आयपीएल’ सामने खेळले. रॉजर बिन्नी यांनी वयाची सत्तरी गाठल्यानंतर त्यांना ‘बीसीसीआय’ अध्यक्षपदापासून दूर जावे लागले. या पदासाठी आता मन्हासला पसंती मिळण्याची दाट शक्यता आहे.

नवी दिल्ली येथे गेल्या आठवड्यात झालेल्या अनौपचारिक बैठकीनंतर ४५ वर्षीय मन्हासचे नाव पुढे करण्याचा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला. अध्यक्षपदासह अन्य काही प्रमुख पदांचा निर्णय पुढील रविवारी होणाऱ्या ‘बीसीसीआय’च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत घेतला जाईल.

‘बीसीसीआय’मधील चर्चेनुसार आता मन्हासची निवड निश्चित मानली जात आहे. ‘‘मन्हास हे माजी खेळाडू असून, त्यांना अध्यक्ष करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे,’’ असे ‘बीसीसीआय’चे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी सांगितले. त्याच बरोबर ‘आयपीएल’ कार्यकारी समितीचे अध्यक्ष अरुण धुमल आपल्या पदावर कायम राहतील. ‘बीसीसीआय’चे विद्यमान सचिव देवजीत सैकिया, अरुण धुमल, कर्नाटक राज्य संघटनेचे अध्यक्ष माजी क्रिकेटपटू रघुराम भट यांनीही विविध पदांसाठी अर्ज दाखल केले आहेत.

‘बीसीसीआय’चे सध्याचे कोषाध्यक्ष प्रभतेज भाटिया हे नव्या कार्यकारिणीत संयुक्त सचिव होतील. सर्वोच्च समितीत क्रिकेटपटूंचे प्रतिनिधी म्हणून दिलीप वेंगसरकर यांची जागा सौराष्ट्राचे जयदेव शहा घेतील.

आगामी वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाच्या निवडीसाठी निवड समितीची बैठक आभासी पद्धतीने २३ किंवा २५ सप्टेंबर रोजी अपेक्षित आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) स्पर्धेत भारताची ही मायदेशातील पहिलीच मालिका असेल. पहिला सामना अहमदाबाद (२ ते ६ ऑक्टोबर), तर दुसरा सामना नवी दिल्ली (१० ते १४ ऑक्टोबर) येथे रंगणार आहे.

भाजपच्या रणनीतीचा प्रभाव?

मिथुन मन्हासने ‘बीसीसीआय’ अध्यक्षपदासाठी अर्ज केला, तेव्हा अवघ्या क्रिकेटविश्वाच्या भुवया उंचावल्या. आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकलेले सौरभ गांगुली आणि हरभजन सिंग यांसारख्या माजी खेळाडूंची नावे चर्चेत असताना मन्हासला पसंती मिळण्यामागे वेगळेच राजकारण असल्याचे मानले जात आहे.

या चालीत भाजपच्या रणनीतीचा प्रभाव असल्याची चर्चा सुरू झाली. रघुराम भटसारखा माजी कसोटीपटू कोषाध्यक्ष होत असेल, तर मन्हास यांना संयुक्त सचिव करणे समजण्यासारखे होते. मात्र, दिल्लीत गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीनंतर थेट अध्यक्षपदासाठी मन्हासचे नाव पुढे आले.

‘‘दिल्ली (रेखा गुप्ता), मध्य प्रदेश (मोहन यादव) आणि राजस्थान (भजन लाल शर्मा) या राज्यांत फारशा प्रचलित नसलेल्या व्यक्तींकडे सर्वोच्च पद (मुख्यमंत्री) सोपविण्यात आले. आता क्रिकेटमध्येही हेच पाहायला मिळू शकेल,’’ असे निरीक्षण एका वरिष्ठ माजी पदाधिकाऱ्याने नोंदवले.

मन्हासने प्रथम श्रेणीत ९७१४ धावा, तर ‘लिस्ट ए’ क्रिकेटमध्ये (एकदिवसीय) ४१२६ धावा केल्या. यात २७ शतकांचा समावेश आहे. कुशल कर्णधार आणि चांगला माणूस, तसेच कमालीचा व्यावहारिक म्हणून त्याची ओळख आहे. यामुळेच मन्हास याची निवड केल्याचे आता बोलले जात आहे.