फ्रँकफर्ट : विश्वचषक फुटबॉल स्पर्धा १९७४ मध्ये पश्चिम जर्मनीच्या विजेतेपदात महत्त्वाची भूमिका बजावणे बर्नड होल्झेनबाइन यांचे मंगळवारी निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. होल्झेनबाइन यांचा माजी क्लब आइनट्रॅक फ्रँकफर्टने त्यांच्या निधनाची बातमी दिली. ‘‘आजपर्यंतचा आमच्या क्लबचा सर्वात महान खेळाडू हरपला,’’ अशा शब्दांत फ्रँकफर्ट क्लबने होल्झेनबाइन यांनी आदरांजली वाहिली.

हेही वाचा >>> इंग्लंडचे फिरकी गोलंदाज डेरेक अंडरवूड यांचे निधन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

होल्झेनबाइन पश्चिम जर्मनीसाठी ४० सामने खेळले. १९७४ मधील विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीतील त्यांची कामगिरी कायम लक्षात राहते. घरच्या मैदानावर पश्चिम जर्मनी संघाने नेदरलँड्स संघाविरुद्ध पिछाडीवरून विजय मिळवला होता. या सामन्यात प्रचंड दडपणाखाली होल्झेनबाइन यांनी नेदरलँड्सच्या गोलकक्षात प्रवेश करून खुबीने पेनल्टी मिळवली होती. या संधीवर पॉल ब्रेटनरने गोल केला होता. त्यानंतर गर्ड मुलर यांच्या गोलने पश्चिम जर्मनीने विजेतेपद पटकावले होते. पुढे होल्झेनबाइन यांनी १९७६ च्या युरो अजिंक्यपद स्पर्धेतही पश्चिम जर्मनीला अंतिम फेरीत नेले होते. अंतिम फेरीत चेक प्रजासत्ताकविरुद्ध (तेव्हाचे झेकोस्लोव्हाकिया) होल्झेनबाइन यांनी गोल करून पश्चिम जर्मनीला नियोजित वेळेत २-२ अशी बरोबरी मिळवून दिली होती. मात्र, शूटआऊटमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला. होल्झेनबाइन आपल्या क्लब कारकीर्दीत बहुतांश काळ फ्रँकफर्टकडून खेळले. निवृत्तीनंतर त्यांनी फ्रँकफर्टचे उपाध्यक्षपद भूषवले.