Team India Playing 11 For IND vs ENG 1st Test: भारत आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना २० जूनपासून हेडिंग्लेच्या मैदानावर रंगणार आहे. या मालिकेसाठी संघाची घोषणा होण्यापूर्वी विराट कोहली आणि रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणी केली. त्यामुळे संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी युवा फलंदाज शुबमन गिलकडे सोपवण्यात आली आहे. या सामन्यासाठी कोणत्या ११ खेळाडूंना संधी मिळणार,हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान भारताचे माजी क्रिकेटपटू आणि माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्राी यांनी पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची प्लेइंग ११ निवडली आहे.
सलामीला कोण?
आतापर्यंत रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल ही जोडी भारतीय संघासाठी डावाची सुरूवात करत होती. पण रोहित शर्माने निवृत्ती जाहीर केल्यामुळे त्याची जागा रिकामी आहे. त्यामुळे यशस्वी जैस्वालसोबत डावाची सुरूवात करण्यासाठी रवी शास्त्री यांनी केएल राहुलची निवड केली आहे. केएल राहुलकडे इंग्लंडमध्ये फलंदाजी करण्याचा चांगलाच अनुभव आहे. त्याच्या अनुभवाचा भारतीय संघाला फायदा होऊ शकतो. तर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी त्यांनी साई सुदर्शनची निवड केली आहे. चौथ्या क्रमांकावर कर्णधार शुबमन गिलला स्थान दिलं आहे.
पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी रवी शास्त्री यांनी ८ वर्षांनंतर कमबॅक करत असलेल्या करूण नायरला संधी दिली आहे. तर सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी त्यांनी उपकर्णधार ऋषभ पंतला प्लेइंग ११ मध्ये स्थान दिलं आहे. अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांनी रविंद्र जडेजाचा प्लेइंग ११ मध्ये समावेश केला आहे. तर शार्दुल ठाकूर आणि नितीश कुमार रेड्डी या दोघांमधून कोणाला संधी मिळणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. रवी शास्त्रींनी यावर तोडगा काढला आहे.
त्यांच्या मते, नितीश कुमार रेड्डी दमदार फलंदाज आहे. पण जर तो १२-१४ षटकं गोलंदाजी करणार असेल, तर त्याला प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळू शकते. तर शार्दुल ठाकूरदेखील प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळवण्यासाठी प्रबळ दावेदार आहे. यासह वेगवान गोलंदाज म्हणून त्यांनी मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि जसप्रीत बुमराह यांची निवड केली आहे.
पहिल्या कसोटीसाठी अशी आहे रवी शास्त्रींनी निवडलेली प्लेइंग ११:
केएल राहुल, यशस्वी जैस्वाल, साई सुदर्शन, शुबमन गिल ( कर्णधार), करूण नायर, ऋषभ पंत ( उपकर्णधार, यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर/नितीश कुमार रेड्डी,जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा