करोना विषाणूमुळे भारतातील स्थानिक क्रिकेट हंगाम विस्कळित झाला आहे. परंतू आता  गोष्टी पुन्हा रुळावर येत आहेत. पुढील वर्षी रणजी करंडक स्पर्धा होणार असून  यानिमित्ताने एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अंशुमन रथचा ओडिशाच्या संघात समावेश करण्यात आला आहे. अंशुमन हा हाँगकाँगसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला आहे, पण आता तो टीम इंडियाकडून खेळण्यासाठी रणजी स्पर्धेत आपली चमक दाखवेल.

हाँगकाँगमध्ये जन्मलेल्या अंशुमनचे पालक ओडिया आहेत. त्याने हाँगकाँगकडून १८ एकदिवसीय आणि २० टी-२० सामने खेळले आहेत. याशिवाय, त्याने पाच प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत परंतु हे सामने कोणत्याही राष्ट्रीय चॅम्पियनशिप स्पर्धांचा भाग नव्हते.

क्रिकबझशी बोलताना अंशुमन म्हणाला, ”ओडिशा क्रिकेट असोसिएशनने (ओसीए) हार्दिक स्वागत केले आहे आणि खेळाडू खूप मैत्रीपूर्ण आहेत. मी या वर्षी ओडिशाचे प्रतिनिधित्व करण्यास उत्सुक आहे. मला माझ्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडायचे होते. मला खरोखरच आव्हानात्मक वातावरणात खेळायचे होते जे अतिशय व्यावसायिक आहे आणि त्यासाठी भारतापेक्षा चांगले स्थान दुसरे कोणतेही नाही.”
२०१५मध्ये अंशुमन टी-२० क्वालिफायर सामन्यांमध्ये चमकदार खेळला. तो आयसीसी वर्ल्ड क्रिकेट लीगचाही भाग राहिला आहे. तेथे त्याने सर्वाधिक धावा केल्या. याशिवाय त्याने आयसीसी इंटर-कॉन्टिनेंटल कप, वर्ल्ड क्रिकेट लीग डिव्हिजन टू आणि २०१८ वर्ल्डकप (एकदिवसीय) क्वालिफायर्समध्येही सक्रिय सहभाग घेतला आहे.

हेही वाचा – विराट कोहलीला जबर धक्का, अष्टपैलू क्रिकेटपटू पडला संघाबाहेर

ओडिशा संघासोबत खेळताना त्याचा रणजी ट्रॉफी प्रवास आता पाहायला मिळणार आहे. २०१९मध्ये, त्याला विदर्भासोबत रणजी खेळण्यासाठी करारबद्ध करण्यात आले होते, पण करोनामुळे रणजी ट्रॉफीचे आयोजन करता आले नाही.

आशिया कपचा तो सामना…

२०१८मध्ये झालेला आशिया कपचा सामना सर्वांना लक्षात असेल. या स्पर्धेत हाँगकाँग सारख्या संघाने गट सामन्यात भारताचा पराभव जवळपास निश्चित केला होता. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील खेळणाऱ्या टीम इंडियाच्याल कुलदीप यादव आणि यजुर्वेंद्र चहलसमोर हाँगकाँगचे शेपटाकडील फलंदाज उभे राहू शकले नाहीत. भारताने सामना २६ धावांनी जिंकला. अंशुमन रथच्या हाँगकाँग संघाने या सामन्यात २५९ धावा केल्या होत्या. भारताविरुद्ध ७३ धावांची खेळी खेळणारा तोच अंशुमन आता भारतीय घरगुती हंगामात खेळताना दिसणार आहे.